Press "Enter" to skip to content

पोलादपूर तालुक्यातील तीन थेट सरपंच बसले घरी

नवीन सरपंच निवड – चौथ्या सरपंचाची जागा रिक्तच 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷

तालुक्यातील गेल्या आठ महिन्यांपासून राजिनामे दिलेले चार ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पदासह सदस्यपदावरूनही बेदखल झाल्यानंतर याबाबत वृत्तपत्रांनी उठविलेल्या आवाजानंतर तातडीने निवडणुका होऊन सदस्यांमधून तीन नवीन सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून तीन थेट सरपंच कायमचे घरी बसले आहेत.

मात्र, लोहारे येथील सरपंचपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने तेथील रिक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक कधी लागणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघटना, पक्षादेश आणि गावकीचे निर्णय हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात प्रभावी ठरत असून विशिष्ट पदासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरलेला असताना या संकल्पनांमुळे पदांवरील व्यक्तींना त्यांचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच राजिनामे द्यावे लागत आहेत. थेट सरपंच पदासाठी पाच वर्षांचा पूर्ण कालावधी असताना अडीच वर्षे अथवा दोन वर्षे कालावधीचे दोन आणि शेवटच्या एका वर्षासाठी एक असे तीन सरपंच विराजमान केले जात आहेत.

ग्रामपंचायत काटेतळी येथील थेट बिनविरोध महिला सरपंचांसह आठ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती अजय मोरे यांनी 27 जानेवारी 2020 रोजी राजिनामा दिल्यानंतर तसा अहवाल 24 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. बहुचर्चित सरपंचांसह 10 सदस्यीय लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच किसन दगडू पारकर यांनी दि. 2 मार्च 2020 रोजी दिलेल्या राजिनाम्याबाबत 8 मे 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल देण्यात आला. उमरठ येथील सरपंचांसह 8 सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ गोपाळ कळंबे यांनी 24 जून 2020 रोजी राजिनामा दिल्यानंतर 13 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल देण्यात आला तर सरपंचांसह आठ सदस्यीय ओंबळी ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत सहदेव चिकणे यांनी 14 जुलै 2020 रोजी राजिनामा दिल्याचा अहवाल 11 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. मात्र, या रिक्त सरपंच पदांबाबत रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रामपंचायत उपमुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर याप्रश्नी आता राज्यसरकारचाच अभिप्राय मागविण्याचा निर्णय झाला.

यापैकी लोहारे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद काही वादग्रस्त विषयांनंतर राजिनामा दिल्याने रिक्त झाले असून यावेळी एका सदस्यानेदेखील राजिनामा सादर केल्यानंतर मंजूर झाल्याने या ग्रामपंचायतीबाबतचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही.

लोहारे ग्रामपंचायत वगळता उर्वरित ओंबळी, काटेतळी आणि उमरठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी सदस्यांमधून निवडणूक प्रक्रिया दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली. त्यानुसार काटेतळी ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून सौ.नंदा प्रदीप मोरे, ओंबळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शशिकांत लक्ष्मण चिकणे आणि उमरठ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत गजानन कळंबे यांची बिनविरोध निवडणूक झाली असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समितीचे गट अ गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.