शाब्बास शोभा ताई
जेष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी कुलाब्यातील एका गुजराती ज्वेलर्सने मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्या तिथेच आंदोलनाला बसल्या. त्यांनी १२ तास म्हणजे काल रात्रभर त्या दुकानासमोर बसून काढले. त्यांचे वय ७५ वर्षे आहे. त्या दुकानदाराने पोलिसांना बोलावून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्या गेल्या नाहीत आणि घाबरल्या नाहीत. सकाळी मनसेचे संदीप देशपांडे यांना हकीकत समजल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. तोपर्यंत पोलिसही आले होते. देशपांडे यांनी त्या दुकानदाराला चोप दिला आणि शोभा देशपांडे यांची माफी मागायला लावली आणि त्याने चक्क मराठीत त्यांची माफी मागितली. म्हणून शाब्बास शोभा ताई,पण मराठी चा गळा घोटणाऱ्यांना जेव्हा शोभा ताई अद्दल घडवत होत्या तेव्हा सामान्य मराठी माणूस काय करत होता हा प्रश्न महत्वाचा.
शिवाजी जन्मावेत पण ते शेजारच्या घरात…ही सर्व सामान्य मराठी माणसाची भूमिका असते.त्या मुळे फूटपाथ वर ज्येष्ठ लेखिका 12 तास काढत असते तेव्हा कुठे गेला होता मुंबई मधला मराठी माणूस???
वास्तविक बातमी फ्लॅश झाल्यावर तासाभरात हजारो मराठी माणसांनी तिथे जमणे अपेक्षित होते.नाही म्हणजे कंगना मुंबई मध्ये येते कळल्यावर नाही का जमले होते विमानतळाच्या बाहेर अगदी तस्सेच जमायला हवे होते.पण तसे झाले नाही.
महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलीस बोलवून अपमानित केले.देशपांडे यांना दुकानदाराने आणि पोलिसांनी दुकानाच्या बाहेर काढले म्हणून काल सायंकाळ ५ वाजल्यापासून दुकानासमोर ठिय्या मांडून बसल्या होत्या.
पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जो पर्यंत येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही तो पर्यंत इथून हलणार नाही अशी त्यांची भूमिका होती, त्या पोलिसांचे देखील ऐकण्यास तयार नव्हत्या,
७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या शोभा देशपांडे विना अन्नपाण्याच्या त्याठिकाणी आंदोलन करत होत्या.
शोभा देशपांडे एक लेखिका आहेत, मराठी प्रेमी आहेत आणि मराठीचा नेहमी आग्रह करत असतात, त्यातुनच सदर दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले, आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करतेय असे त्यांचे म्हणणे होते.
इतक्या वयस्कर महिलेचा अपमान करणाऱ्या दुकानदाराचा निषेध!नुसता निषेध नव्हे तर ज्येष्ठ मराठी स्त्री ला त्रास दिल्याबद्दल नजीकच्या कालखंडात त्यांना आमचे सविनय कायदे भंग करणारे रूप दाखवूनच देऊ.यासगळ्यात महत्वाचे म्हणजे
पोलिसांनी दुकानदारावर कारवाई करावी तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी त्यांना अपमानित केले त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी.एरवी फुस्कुल्या ट्विट वरून मुंबई पोलिसांना त्यांची इभ्रत गेल्यासारखी वाटते.मग कालच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वागण्याने त्यांच्या इज्जतीचा वारू उधळला काय? असो
मराठीचा अपमान होत असताना, मराठी पोलिसांनी देखील मराठी महिलेलाच अपमानित करणे हे निंदनीय आहे.
एकीकडे शोभा ताई ठिय्या मांडून आंदोलन करत असताना तमाम मराठी बांधव काय करत होते? तर कित्येक जण आयपीएल बघण्यात गुंगले होते.कुणी त्या घासून गुळगुळीत झालेल्या बातम्या बघत होते. विट आलेल्या अमिताभच्या घासून गुळगुळीत झालेल्या kbc मध्ये कित्येकांचा जीव अडकला होता.खप्पड थोबडाच्या गुरुनाथ ला तिसरी पोर पटवताना बघणे कित्येक मराठी लोकांना सुखाचे वाटत होते. बबड्या चे पोरखेळ पाहणे कित्येक मराठी स्त्रियांना अभिमानाचे वाटते,उरलेले स्मार्ट फोन च्या जगात रमले होते.काही मूठभर covid विरोधात लढत सुद्धा होते,त्यांना तूर्तास या आरोपपत्रात समाविष्ट करणे उचित होणार नाही.
उद्या उपरोक्त लोकांच्यात वसलेले काही बुद्धिजीवी जीव मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आयोजित व्याख्यानात घसा फोडून कुठेतरी बोलताना दिसतील सुद्धा. आजही या भाषेचा गोडवा, बाणा आणि दर्जा शोभाताई देशपांडे यांच्यासारख्या कट्टर मराठी भक्तांनी टिकवून ठेवला आहे.यात आठवले महोदयांच्या तिरक्या भूमिकेचे समर्थन करता येणार नाही. तशी त्यांची कुणी फारशी दखल घेत नाही.तर देशात सर्वधर्मसमभाव असावा व अन्य राज्यातील लोकांनी मलादेखील स्वीकारावे ही भूमिका आमची सुद्धा आहे. पण म्हणून मुंबईत मराठी न बोलण्याचा अधिकार किंबहुना त्या प्रकारची अरेरावी करण्याचा अधिकार या हलकट व्यापाऱ्यांना कोणीही दिलेला नाही.
शोभा ताईंच्या आंदोलनानंतर किती जण प्रेरित होतील ते मला माहित नाही. परंतु एक मराठी व्यक्ती म्हणून माझ्यात झालेला सकारात्मक बदल किमान मला तरी दिसतोय.म्हणूनच कौतुकाने म्हणतोय शाब्बास शोभा ताई…


Be First to Comment