Press "Enter" to skip to content

मनमानी मातीभरावासाठी ठेकेदारावर दबावतंत्राचा वापर

पोलादपूरचे प्रभातनगर-पश्चिम तुंबतेय एल ऍण्ड टी च्या नियोजनशून्य भरावामुळे

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) #

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतल्यानंतर सद्यस्थितीत तास दोनतास संततधार झाल्यानंतर पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभातनगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये पावसाचे पाणी तुंबून नागरिकांची तारांबळ उडत आहे. काही व्हायरल अफवाकारांच्या दबावतंत्रामुळे एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून कोणतेही नियोजन न करता मातीभराव केला जात असून याकामी अफवाकारांनी संबंधित नागरिकांकडून आपले उखळ पांढरे करून घेतल्याची जोरदार चर्चा होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पोलादपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथपर्यंत दिसू लागले आहे. प्रभात नगर पश्चिम येथे सध्या दोन तासांपर्यंत झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या मागील डोंगररांगांतून येणारे पावसाच्या पाण्याचे लोट शहराच्या पूर्वेकडे असलेल्या उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पात्रापर्यंत पोहोचण्यास मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अडथळा झाला आहे. परिणामी, प्रभात नगर पश्चिम येथे नेहमीच काही काळ पूरस्थिती निर्माण होत आहे. या पुरकाळामध्ये प्रभातनगरमधील अनेकांचे बगिचे आणि व्हरांडे पाण्याखाली जात असून येथील अंतर्गत रस्तेही पुराखाली गायब होत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत चौपदरीकरणाची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी बांधण्यात आलेल्या काँक्रीट गटारांलगत असलेल्या खोल भागातून पाटाचे पाणी वाहू लागत असून काँक्रीट गटारांमध्ये हे पाणी शिरत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या महामार्गाच्या गटारांच्या रूंदीच्या अर्धी रूंदी काँक्रीट गटांरांची आणि अर्धी रूंदी खुल्या पाटाच्या पाण्याची अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

अशातच, दोन चार वेळा पुरस्थिती ओसंडून वाहू लागल्यानंतर प्रभातनगर पश्चिम येथील काही राजकीय हितसंबंध आणि व्हायरल अफवाकारांशी सख्य असलेल्यांनी एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून कोणतेही नियोजन न करता मातीभराव केला असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, या भरावामुळे पुराचे पाणी अडविले जाऊन खुल्या पाटातून वेगाने पाण्याचा प्रवाह वाहू लागणार आहे. त्यामुळे प्रभातनगर पश्चिम येथील अंतर्गत रस्त्यांना महामार्गापर्यंत जोडणाऱ्या मोरीवरून पाणी जाऊन येथून पादचाऱ्यांना ये-जा करणे जिकिरीचे होणार आहे.

याबाबत, एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून संबंधित जमिनमालकांची परवानगी आणि माती भरावाची रॉयल्टी भरण्याची तयारी असल्यास भराव केला जात असल्याचे सांगण्यात आले असून काही वेळेस दबाव येत असल्यास तातडीने कामे करावी लागत असल्याने याबाबत अवश्य बातम्या प्रसिध्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.