Press "Enter" to skip to content

किडनी प्रत्यारोपण झालेल्या जेष्ठ नागरिकाने केली कोरोनावर मात ! 

उच्च रक्तदाब मधुमेह व स्ट्रोक असूनही १२ दिवसात कोरोनामुक्त 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी । मुंबई ।🔶🔶🔷🔷

आज आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्ह्णून साजरा होत असताना मुलुंड येथील ७१ वर्षीय जेष्ठ नागरिकाने कोरोनावर मात करून खऱ्या अर्थाने आज जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.

देशभरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे, जगात रुग्ण बरे होणाऱ्या संख्येच्या बाबतीत भारत उच्च स्थानावर पोहोचला आहे, ही संख्या जगातील एकूण संख्येच्या १९ टक्के एवढी आहे. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे भारतामध्ये  मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजार असलेले अनेक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत.

उच्च रक्तदाब, मधुमेह व स्ट्रोक असूनही १२ दिवसात कोरोनामुक्त होण्याचा एक नवा विक्रम मुंबईतील एका जेष्ठ नागरिकाने केला आहे. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेले तसेच उच्च रक्तदाब, स्ट्रोक व मधुमेह असलेले  ७१ वर्षीय अरविंद बावल यांनी नुकतीच कोरोनाची लढाई जिंकली आहे.

श्री बावल यांच्यावर २०१५ साली किडनी प्रत्यारोपणाची शल्य चिकित्सा झाली होती तसेच किडनीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्याना इम्युनोसप्रेसन्ट ड्रग सुरु होते. दोन वर्षांपूर्वी त्याना स्ट्रोकसुद्धा येऊन गेला होता तसेच त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता, कोरोना झाल्यानंतर त्याना तातडीने मुलुंड येथिल अपेक्स हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. किडनी प्रत्यारोपण, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच स्ट्रोक असे गंभीर आजार असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे फारच जिकीरीचे काम होते. 

याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे सल्लागार एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात, ” कोरोनापूर्वी आलेल्या महामारीमध्ये किडनी प्रत्यारोपण झालेल्या अनेक रुग्णांची जीवितहानी झाली असल्याचा इतिहास आहे, चीन व कोरिया मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या अनेक रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद आहे, भारतामध्ये अवयव प्रत्यारोपणाची संख्या कमी असल्यामुळे आपल्याकडे याबाबत ठोस आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाला इम्युनोसप्रेसन्ट औषध सुरु असते व या औषधांमुळे प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते.

अरविंद बावल जेंव्हा अपेक्स हॉस्पिटलमध्ये आले होते तेंव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. किडनी प्रत्यारोपण झाल्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली होती, अशा परिस्थितीत त्यांना ३ दिवस आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते या संपूर्ण काळात आमच्या टीमने रक्तशर्करा पूर्ववत आणून  व प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केल्यामुळे तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली , नंतर ८ दिवस त्यांना आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवून त्याना नंतर जनरल वॉर्ड मध्ये आणण्यात आले.

 या काळामध्ये त्यांच्यावर रेमेडेव्हिव्हिर थेरपीचा वापर करण्यात आला व या उपचाराला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. किडनी प्रत्यारोपण, स्ट्रोक, मधुमेह व उच्च रक्तदाब अशा अनेक जटील समस्या असूनही अरविंद बावल यांना १२ दिवसात  कोरोनामुक्त करण्याचा एक वैद्यकीय विक्रम अपेक्स हॉस्पिटलने केला आहे.

या संपूर्ण काळात अरविंद बावल यांच्या  चेहऱ्यावर स्मित हास्य कायम होते, कोरोना संक्रमणात जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याच्या या वृत्तीमुळे त्यांनी आज कोरोनावर मात केली आहे.” 

गेल्या काही दिवसात अगदी १०६, ९८ ,९३, ९८ अशा वयोगटातील नागरिक कोरोनामुक्त झाल्याच्या घटना आपलं एकटाच आहोत परंतु गंभीर आजार असणारे जेष्ठ नागरिक आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अरविंद बावल यांनी  कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांचे  व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.