Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन कक्षाचे उद्घाटन

पृथ्वीवरील ईश्वर म्हणजे डॉक्टर होय… अनिकेत तटकरे 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन : संतोष सापते 🔷🔶🔶🔷

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत मानवाला कोरोनाच्या महामारी पासून वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. देवघरातील देव व रुग्णालयातील डॉक्टर यांना जनतेने सदैव वंदन केले आहे. पृथ्वीवरील ईश्वर म्हणजे डॉक्टर होय अशी सर्वसामान्य जनतेची धारणा आहे असे प्रतिपादन अनिकेत तटकरे यांनी केले.

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला व आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाची वास्तु श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी सुविधा, सेवा पुरवण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मी सदैव प्रयत्नशील आहे. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञान युक्त उपकरणे, साहित्य सर्वकाही उपलब्ध करण्यात आले आहे. डिजिटल एक्स-रे मशीन, व्हेंटिलेटर, सोनोग्राफी मशीन, ऑटोमॅटिक सॅनिटाझर मशीन व 50 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे काम करण्यात आलेले आहे.

तालुक्यातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जनतेला स्थानिक पातळीवर योग्य व मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण व शहरी भागातील व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात सर्व आजारावरती औषधोपचार करण्यात यावा या दृष्टिकोनातून उपजिल्हा रुग्णालयातील सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे. आधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका आपण रुग्णालयासाठी उपलब्ध केलेली आहे. कोरोना व इतर गंभीर प्रसंगी रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी आज आपण सेंट्रल ऑक्सिजन कक्षाची स्थापना केली.

कोरोना रुग्णाच्या दृष्टिकोनातून सेंट्रल ऑक्सिजन कक्ष महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्याकडे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन चा साठा आपण उपलब्ध केला आहे. असे तटकरे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या प्रत्येक संकटसमयी मी सोबत आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याची मी नेहमी काळजी घेत आहे. सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हे आपणा सर्वांचे दायित्व आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील विविध बाबी संदर्भात मी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी सदैव संपर्कात आहे. श्रीवर्धन मधील जनते ची आरोग्य सेवे विषयी कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची मला खात्री आहे. कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही संकटामध्ये सर्व आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले आहे असे अनिकेत तटकरे यांनी सांगितले.

सेंट्रल ऑक्सिजन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर ढवळे, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, बालरोग तज्ञ डॉक्टर महेंद्र भरणे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी व श्रीवर्धन मधील नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.