सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
शाळा- महाविद्यालयांनी पालकांकडे शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. फी जमा केली नाही तर मुलाचा प्रवेश रद्द होईल, असा दमही दिला जात आहे. कोरोना संकटामुळे पालक सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे फी कशी भरावी, अशी चिंता त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे सहा महिन्यांपासून शाळा- महाविद्यालये बंद आहेत. नव्याने प्रवेशप्रक्रिया मात्र सुरू आहे. पहिली, 11वी, तसेच पदवीधर विद्यार्थ्यांनी पुढील वर्षात प्रवेश घेतले आहेत, तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. शाळा- महाविद्यालये फी मागत आहेत. अनेक ठिकाणी प्रवेश घेतानाच तशी मागणी होते.
शाळा- महाविद्यालये सुरू नाहीत, मग फी कशाची?ऑनलाइन अभ्यासतही फारशी प्रगती नाही. त्यामुळे फी कमी करावी किंवा माफ करावी, अशी मागणी अनेक पालकांकडून होत आहे. सध्या अनेक व्यवसाय बंद आहेत. काही नुकतेच सुरू झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही अडचणीत आहेत. एवढ्यात शाळा, महाविद्यालये सुरू होतील याचीही शक्यता नाही. त्यामुळे सवलतीची मागणी होत आहे. या सक्तीमुळे एखाद्या पाल्यांनी अथवा पालकांनी जर बरवाईट केले तर त्याची जबाबदारी कोण घेईल असा सवाल या निमित्ताने उभा राहत आहे.
शाळा प्रशासनाकडे याची पत्रकारांनी विचारणा केली असता आम्ही कोणाकडेच फी मागत नाही. गेल्या वर्षाचीच फी अनेकांकडून येणे बाकी आहे. काही प्रमाणात ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. सरकारी पातळीवर शैक्षणिक वर्ष बदलण्याचा विचार सुरू आहे. पालकांच्या अडचणीचा विचार करून, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर निर्णय घेऊ असे शाळेचे प्रशासन सांगते. मग शाळेच्या शिक्षकांकडून पालकांच्या व्हाट्सएपवर शाळेच्या नावाने मेसेज कसे पाठविले जातात. याची विचारणा केली असता काही सांगत नाहीत.
उरण पंचायत समितीच्या गटशिक्षण विस्तार अधिकारी प्रियंका पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता. त्यांनी अशा प्रकारे कोणतीही शाळा फी भरण्यास सक्ती करू शकत नाही. तशा संबंधित शाळांना सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगत जोपर्यंत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड फी संबधी आदेश देत नाही तोपर्यंत पालकवर्गांवर फी भरण्याची सक्ती करता येणार नसल्याचे सूतोवाच केले आहे.






Be First to Comment