Press "Enter" to skip to content

कानसळ गावानजीक आढळलेल्या”त्या” तरुणाच्या मृतदेहाचे 9 तासांनंतर झाले शविच्छेदन!

खून अथवा संशयास्पद मृत्यू असण्याच्या शक्यतेने शविच्छेदन करण्यास जांभुळपाडा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नकार : नातेवाईकांचा संताप 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

सुधागड  तालुक्यातील कानसळ  गावानजीक एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दिपक लक्ष्मण पवार (वय 31) असे मयत तरुणाचे नाव.  या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्या जवळ आढळला होता. या मृतदेहाचे शविच्छेदन करण्यास जांभुळपाडा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. त्या तरुणाचा खून अथवा संशयास्पद मृत्यू असण्याच्या शक्यतेने शविच्छेदन करीत नसल्याचे यावेळी डॉ.खिल्लारे यांनी स्पष्ट केले.  

 त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर 9 तासांनंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  त्या मृतदेहाचे शविच्छेदन  केले.

     पाली  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत दिपक लक्ष्मण पवार वय वर्ष 31 मुळ:  राहणार राबगाव आदिवासीवाडी ता.सुधागड सध्या राहणार कानसळ आदीवासीवाडी ता. सुधागड हा तरुण सोमवारी (दि.31) संध्याकाळी चार वाजता कानसळ आदीवासीवाडी येथून घरात कोणास काही न सांगता निघून गेला होता. मंगळवारी (दि.1) सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कानसळ आदीवासीवाडीच्या दक्षिणेस भुईशेत नावाच्या पडीक शेत जमिनीच्या बांधाच्यामध्ये साठलेल्या पाण्याजवळ हा तरुण मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. साबळे, सहाय्यक फौजदार एफ.बी.तडवी, एम.एम.लांगी हवालदार एस.एस.खेडेकर व कांदे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी  सकाळी 9 वाजता जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.  स्मिताराणी खिल्लारे यांनी शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिल्याने मयत दिपक लक्ष्मण पवार यांचा मृतदेह 9 तास प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पडून होता. पोलिस प्रशासनासह नातेवाईकांनी डॉक्टर खिल्लारे यांना विनंती केली. मात्र तरीही शवविच्छेदन करण्यास त्यांनी नकार देऊन तुम्ही मुंबई येथे जे.जे. किंवा के.इ.एम. येथे मृतदेह घेऊन जा असे डॉ. खिल्लारे यांनी सांगितले.

शविच्छेदनाची वाट बघत आरोग्य केंद्राबाहेर बसलेले मृत तरुणाचे नातेवाईक.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांना नातेवाइकांकडून माहिती देण्यात आली होती. त्यानंतर डॉ. मढवी प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथे जाऊन त्यांनी स्वतः मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान या तरुणाचा खून किंवा संशयास्पद मृत्यू झाला असावा असे डॉ. खिल्लारे यांना वाटले. त्यामुळे त्यांनी शविच्छेदनास नकार दिला आणि बॉडी शविच्छेदनासाठी जे.जे. किंवा केईएम ला पाठवावी असे सांगितले. मात्र प्रथम दर्शनी तरुणाचा मृत्यू संशयास्पद वाटत नव्हता. त्यामुळे येथेच शवविच्छेदन करण्यात आले असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. साबळे करीत आहेत.

पंचनामा  करतांना पाली पोलीस.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.