सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
कर्जत नगरपरिषद हद्दीत " बोहरी समाज हॉल " समोर ” नित्यानंद सोसायटीची ” इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. ही इमारत पडली तर जिवीत हानी होण्याची शक्यता त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांनी केली आहे.

1972 साली बांधलेल्या हया इमारतीत गेल्या पंधरा वर्षापासून कोणी रहात नाही. हया इमारतीला चारी बाजूने वड, पिंपळ, आदी झाडांनी वेढले आहे. ” पडक्या इमारतीस झाडांचा आधार ” अशी सध्या परीस्थिती आहे. ही झाडे दुसऱ्या मजल्याच्याही वर जाऊन पोहोचली आहेत.
ही इमारत साक्षात मृत्यूचा सापळा बनली असून कधीही कोसळू शकत असल्याने नित्यानंद इमारत कोसळून जीवित हानी झाल्यास अनेकांचा कायम चा आनंद हिरावून घेऊ शकते. तेथे कोणाचा वावर नसल्याने आडोसा पाहून काहीजण येथे नैसर्गिक विधी करत आहेत. तसेच हया इमारतीच्या आत व आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या व तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो.त्याचप्रमाणे येथे साप, विंचू असण्याची शक्यता आहे.
कर्जत नगरपालिकेने ही इमारत जमीनदोस्त करून येथे स्वच्छता राखून जीवितहानी टाळावी असे पत्र सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहे.पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आल्या आहेत.






Be First to Comment