सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔷🔶
गेल्या अनेक वर्षांपासुन या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची सद्य परिस्थितीत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे याच महामार्गावरील नव्यानेच काम करण्यात आलेल्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या अंबा नदीवरील नवीन व भव्या अशा वाकण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरल्यामुळे जणु काही महामार्गाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
सुमारे नऊ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. पंरतु आजपर्यंत हे काम रखडले असुन बहुतांश ठिकाणी दरवर्षी वारंवार डांबरीकरण करूनही त्या ठिकाणचा महामार्ग दरवर्षी पावसाळ्यात उखडला जात आहे. हे डांबरीकरण एक पावसाळाही काढू शकत नसल्यानेच ठेकेदार कंपनीकडून करण्यात येणारे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचेच होत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.
पेण ते वडखळ, नागोठणे, वाकण, कोलाड या मार्गावर अक्षरश: मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे तसेच चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे सतत अपघात घडत आहेत. त्यामुळे महामार्गावरुण प्रवास करताना वाहन चालकांना व प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच या खड्डयांमुळे ज्या ठिकाणी अर्ध्या तासाचा प्रवास असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी दिड ते दोन तास वेळ लागत आहे.
दरम्यान या पडलेल्या खड्डयांमध्ये ठेकेदार कंपनीकडून मोठ- मोठी खडी टाकुन खड्डे भरण्याचे व डागडुजींचे काम सध्या सुरु आहे. पंरतु हीच खडी रस्त्यावरती आजुबाजुला पसरुन मोटरसायकल घसरुन अपघात होण्याची भिती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच महामार्गावरुन भरधाव जाणा-या ट्रेलर व कंटेनरच्या टायरमुळे खडी ऊडुन दुचाकीस्वार तसेच पायी चालत जाणा-यांना लागुन मोठ्या प्रमाणात दुखापती होत आहेत.






Be First to Comment