कलाकारांना न्याय व हक्काची लढाई करण्यासाठी “महाकलामंडल” अग्रेसर 🔷🔶🔷🔶
महाराष्ट्रातील कलाक्षेत्राशी निगडीत सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळी एकाच छत्राखाली एकत्र 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / मुंबई (साहिल रेळेकर) 💠🌟💠🌟
“महाकलामंडल” या कलाकारांच्या संस्थेच्या वतीने आज सायंकाळी वाजता शिवराज हॉल दादर येथे सोशल डिस्टनसिंगचे पालन करत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाकलामंडलचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, सिने अभिनेते सुशांत शेलार, सिने अभिनेत्री मेघा घाडगे यांच्यासह महाकलामंडल संस्थेचे सर्व सदस्य, विविध कलासंघटना, कलासंस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यापूर्वी कला क्षेत्रातील लोकांसाठी सरकारला कधी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावी लागली नाही, कलाकार आत्मनिर्भर होते व यापुढेही राहतील पण सध्या कोरोनासारख्या आजारामुळे कलाक्षेत्र पूर्णतः ठप्प असल्यामुळे आता कलाकारांच्या आयुष्यात खुप अडचणी निर्माण झाल्या आहेत तर अनेक कलाकारांवर उपासमारीची देखील वेळ ओढावली आहे. या अनुषंगाने कलाकारांच्या माध्यमातून नव्याने बांधणी करण्यात आलेल्या महाकलामंडल च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आजकाल लग्न समारंभ किंवा पारिवारिक कार्यक्रम असो अथवा मंडळाचे उत्सव वा संस्थेचे वर्धापन दिन सोहळे असे अनेक कार्यक्रम साजरे करण्यासाठी सनई चौघड्या पासून ते हिंदी-मराठी वाद्यवृंद पर्यंत बरंच काही लागतं. पण सोहळा संपन्न झाला की तीन चार तास आपल्याला आनंद देण्यास कामी आलेल्या कलाकार तंत्रज्ञांकडे कोणी नंतर ढुंकूनही पाहत नाही. डाळीतील कढीपत्ता जसा जेवताना ताटाच्या बाहेर काढला जातो तसंच यांच्या संदर्भात बोललं तर हे नाकारता येणारं नाही.

आपल्या महाराष्ट्रात जसे फर्लाग भर गेलं की भाषा व अन्न संस्कृती बदलते तशीच लोककलेची संस्कृती सुध्दा बदलते. कोकणातली दशावतारापासुन तमाशाच्या कणादिसह विदर्भातील झाडे पट्टी , खेळे मेळे सादर करणारे लोककलाकार व तंत्रज्ञ लाखांच्या संख्येत असले तरी संघटीत नसल्याने शासन दरबारी सोई सवलती पासून आजवर दूर राहिलेले आहेत. त्यांची नोंद नसल्यामुळे आजवर अपात्र ठरवले गेले. त्यांची एकत्र मोट बांधण्याच्या दृष्टीकोनातून १३ ऑगस्ट २०२० रोजी पुणे येथे श्री.मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महाकलामंडल या शिखर संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
कलाक्षेत्रातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळीना एका छत्राखाली एकत्र आणून न्याय व हक्काची लढाई उभी करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.या लढ्यात महाराष्ट्रातील १०० पेक्षा अधिक संघटना व त्यांचे एकत्रित अंदाजे ६ लाखांपेक्षा अधिक कलाकार या शिखर संघटनेच्या माध्यमातून संघटीत झाले आहेत.
कलाक्षेत्राला ‘इंडस्ट्री’ दर्जा प्राप्त करून देणं, कलाक्षेत्रात संलग्न कलाकार तंत्रज्ञ तसेच सेवा पुरवणा-या अनेक संस्थांची सरकार दरबारी नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करणे,प्रत्येक कलाकाराला सरकारने हक्काचा आरोग्य विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शासकीय सवलतीने हक्काचं घर व एकत्रित विकासासाठी भूखंड मिळावा यासाठी प्रयत्न करणे, सरकारकडे सर्व कलाकारांचा ‘डाटाबेस असावा यासाठी पाठपुरावा करणे, आपत्कालीन प्रसंगात योग्य ती मदत व आर्थिक पॅकेजची मागणी करणे, ज्येष्ठ कलाकारांच्या मासिक निवृत्तीचे वेतन वाढवणे व निश्चित करणे, म्हाडा – सिडकोमध्ये घरासाठी स्पेशल कोटा मागणे, कॉपी राईट नावावर कलाकार व निर्मात्याची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या विषयांवर काम करण्यात येणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.






Be First to Comment