Press "Enter" to skip to content

जनतेच्या मागण्यांसाठी 7 सप्टेंबरला उरण तहसिलदार कार्यालयावर मोर्चा


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

कोरोना कोविड १९ च्या निमित्ताने जनतेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्याच्या निषेधार्थ उरण तहसील कार्यालयावर येत्या सोमवार दि.७ सप्टेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँम्रेड संजय ठाकूर यांनी दिली.

लॉकडाऊनचा चार टप्पा सुरू झाला असला तरी जनतेच्या विविध समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे इतर आजारांचे दुर्लक्ष होत आहे, मुलांना मिळणारे विविध प्रकारचे डोस मिळण्याची प्रक्रिया थांबली आहे. उरणच्या मंजूर१०० खाटांचे हॉस्पिटलचे कामाला सुरुवात होत नाही. रास्तभाव दुकानातून तांदूळ, गहू, डाळ, कडधान्य, खाद्यतेल इत्यादी चिज वस्तूंची जनतेची मागणी आहे , मात्र सरकारी कोठारात पडून असलेला हा साठा उंदीर घुशी खातात परंतु जनतेला दिला जात नाही. रास्तभाव दुकानांत असणाऱ्या धान्यसाठ्याची माहिती लिहीली जाते नाही,धान्य खरेदीची पावती दिली जात नाही.धान्यवाटपात अनियमीतता असते.
वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने वीज खंडीत होत आहे.

यंदा निसर्ग चक्रीवादळाने व त्यानंतर ५ ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे मान्सुन पूर्व काम न झाल्याने पोल पडणे,लाईन तुटणे भूमिगत वीज वाहिन्या नादुरुस्तीचा त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे टीव्ही,फ्रीज, लॅपटॉप,काम्प्युटर ,इस्त्री वगैरे सारख्या वस्तू नादुरुस्त होत आहेत. नव्यानेे सबस्टेशन बनवणार आहोत ही कॅसेट गेली दहा वर्षे लोक ऐकत आहेत. मात्र त्यात सुधारणा नाही, त्यातच १एप्रिल २०२०पासून वीजदर वाढीचा फटका सर्व वीज ग्राहकांना बसला आहे. जनतेला आर्थिक भुर्दंड बसत आहे.

ग्रामिण भागातील एसटीची बस सुविधा आज ही बंद आहे.त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग,सिडको, जेएनपीटी, नॅशनल हायवे अथॉरिटीने भाग पाडले आहे. लॉक डाऊनचे निमित्त करून एकाही अस्थापनेने काम केले नाही,खड्डे भरले नाहीत. आजही प्रवासात हाडे खिळखिळी होऊन अपघात होत आहेत. एकूणच कोविड१९च्या निमित्ताने जनतेला वेठीस धरले आहे. याच्या निषेधार्थ उरण तहसिलदार कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व सीटूचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील व जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मधूसुदन म्हात्रे, जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हात्रें व सेक्रेटरी अमिता ठाकूर,डिवायएफआयचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे, सेक्रेटरी राकेश म्हात्रे तर अ.भा.किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे व सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर करणार आहेत. तरी या मोर्चात मोठ्या संख्येने उरणच्या जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.