सुधागडात ग्राहकांना विजवीतरणचा शॉक 🔶🔷🔶🔷
वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर मनसेने पुकारला लढा : निवेदनाची दखल न घेतल्यास जनआंदोलन छेडण्याचा दिला इशारा 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟
सुधागड तालुक्यातील नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांसदर्भात पाली विजवीतरण कार्यालयात मनसेतर्फे काल बैठक आयोजीत केली होती. यावेळी विजवीतरण अधिकाऱ्यांना वाढीव विजबिलांबाबत जाब विचारण्यात आला. व विद्युत देयके कमी करावीत, नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. मात्र यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे या प्रश्नावर पालकमंत्री आदिती तटकरे , स्थानिक आमदार रविशेठ पाटील , वरिष्ठ पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून या प्रश्नावर तोडगा काढणार अशी माहिती सुनिल साठे यांनी दिली. जनतेला जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही म्हणत मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दि.(2)रोजी पालीतील विजवीतरण कार्यालय गाठले. व संबंधित विजवीतरण अधिकारी यांना मागण्यांचे रीतसर निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले की सध्या संपूर्ण राज्य व देशावर कोरोना महामारीचे संकट आहे. लॉकडाऊन मध्ये संपूर्ण अर्थचक्र कोलमडले असून जनतेसमोर अनेक प्रश्न व आव्हान आहेत. अशा परिस्थितीत येथील सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, श्रमजीवी, मजूर, आदिवासी बांधवांचे कंबरडे मोडावे अशी वीज बिले आकारण्यात आली आहेत. विजवीतरण कंपनीच्या या मनमानी धोरणाविरोधात जनमानसात चीड व संताप व्यक्त होत असून सदरची वाढीव वीज बिले कमी करावीत या मागणीसह मनसे आक्रमक झाली आहे.
विजवीतरण कार्यालयाने वाहन कर, इतर कर, 16 टक्के व्याज, तसेच 2019 डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी नुसार अंदाजे बिले ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप सुनिल साठे यांनी केला. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या या वीज बिल आकारणीला मनसेने कडाडून विरोध केला आहे. सुधागड तालुक्यातील जनतेचे शोषण न करता युनिट दराप्रमाणे बिले द्यावीत, कुणाचेही वीज जोडणी खंडित करू नये, वाढीव वीज बिले भरण्याची नागरिकांना सक्ती करू नये, शिवाय अवाजवी व वाढीव वीज बिले तात्काळ कमी करावीत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, अजिंक्य पाशीलकर, मिलिंद शेळके,प्रणित आंग्रे, विनय सितापराव, कुमार वनगळे, जयेश पाटेकर, तसेच ह भ प महेश पोंगडे महाराज,अन्य मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान विजवीतरण अभियंता श्री जतीन पाटील यांनी वाहन कर, इतर कर व व्याज आकारल्याचे सांगितले, शिवाय लॉक डाऊन काळात मार्च, एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या महिन्यात विजेचा वापर अधिक झाल्याचे सांगत वीज बिले कमी करण्यासंदर्भात सध्यातरी नकारात्मक भूमिका दर्शविली आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून या मुद्द्यावर मनसेची पुढील भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.







Be First to Comment