सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔶🔷
माथेरान मधील सर्व नागरिकांसह छोट्या मोठ्या स्टॉल्स धारक, दुकानदार, लॉजिंग,हॉटेल्स इंडस्ट्री,मोलमजुरी करणारे श्रमिक त्याचप्रमाणे कुली,हातरीक्षा चालक, घोडेवाले यांचे पुर्णतः जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते.परंतु कोरोना सारखे महाभयंकर संकट कोसळल्याने इथे १८ मार्च पासून पुर्णतः लॉक डाऊन करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या लॉक डाऊनला पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे परंतु आजतागायत जनजीवन सुरळीत होऊ शकलेले नाही.
आजवर माथेरान मध्ये कोरोना रुग्णांचे शून्य प्रमाण होते.सर्वांनी उत्तम प्रकारे काळजी घेतली होती परंतु नुकताच काही दिवसांपूर्वी गावातील एका भागात जवळजवळ चौदा व अन्य ठिकाणी दोन असे एकूण सोळा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तसेच दि.१ सप्टेंबर रोजी व्यापारी वर्गाची कोरोना तपासणी केली असता यामध्ये चार आणखीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा आकडा पुढे पुढे वाढत आहेत त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगदी कमी लोकसंख्या असलेल्या या गावात कोरोनाचा शिरकाव जलदगतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सर्व नागरिक हे नेहमीच काहींना काही कारणास्तव एकमेकांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी केल्यास मोठया प्रमाणावर रुग्ण आढळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी,नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत सूचना आणि सोशल मीडियावर माहिती देत आहेत.
याबाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.परंतु इथे सुध्दा आता कोरोनाने आपले पाय घट्ट रोवण्यास सुरुवात केलेली दिसत आहे.त्यामुळे नागरिक भयभीत झालेले पहावयास मिळत आहेत.
या लॉक डाऊनच्या पाच महिन्याच्या महाभयंकर काळात नागरिकांना कुठल्याही जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत कमतरता भासू नये यासाठी आजवरच्या कार्यकाळात मुंबई, पुण्यातील अनेक सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्तींनी, काही राजकीय मंडळींनी सुध्दा मदतीचा हातभार लावून नागरिकांना उदरनिर्वाहासाठी मुबलक प्रमाणात साहित्याचे वाटप केलेले आहे.त्यामुळे नागरिक निर्धास्तपणे आपले जीवन जगत आहेत.इथल्या अश्वपालकांना आपल्या अश्वांच्या खाद्यासाठी विविध ठिकाणांहून भूशाचे वाटप सुध्दा दानशूर लोकांनी,विविध संस्थेच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर करण्यात आलेले आहे.

मागील तीन दशकांपूर्वी इथले सर्व व्यवहार हे पावसाळ्यात पुर्णतः बंद असायचे.घोडे चार महिने पावसाळ्यात आपापल्या तबेल्यातच आराम करीत असत.तेव्हा घोडे सुध्दा गुटगुटीत राहत होते परंतु या कोरोनाच्या लॉक डाऊन मधील कार्यकाळात की काय घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने आजारी पडत असल्याबाबतीत काही अश्वपालकांकडून विविध प्रसार माध्यमाकडे दिलेल्या मुलाखती मधून तक्रारी ऐकावयास मिळत आहेत.
गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे जेणेकरून अन्य व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात आर्थिक सुबत्ता येऊ शकते.या सर्वांगीण चांगल्या उद्देशानेच काही मंडळे, संस्था,आणि काही पक्षाची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत.पाच महिन्यांच्या लॉक डाऊन नंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात आला तर आणखीन रुग्ण वाढू शकतात.
मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ असल्याने मोठया प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सर्वांनाच आपापले व्यवसाय मनात भीती ठेऊनच करावे लागणार आहेत त्यातूनही इथल्या सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीकोनातून इथे पर्यटन सुरू व्हावे ही भूमिका जरी व्यावसायिकांच्या हिताच्या बाबतीत सकारात्मक आणि योग्य असली तरीसुद्धा या लहानशा गावात कोरोना रुग्ण वाढत गेल्यास त्यासाठी प्रशासनाला खूपच त्रासदायक ठरू शकते.सर्वसामान्य लोकांना पुढील अवाजवी वैद्यकीय खर्च हे न परवडणारे आहेत.त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच द्विधा मन:स्थिती इथल्या स्थानिकांची झाली आहे.
देशात लाॅकडाऊन घेण्याचा उद्देश हा कोरोनाला हद्दपार करणे हा होता. मार्चमधे दररोज पाच दहा बाधीत मिळायचे तोच आकडा सहा महीन्यांच्या लाॅकडाऊनतरही पंच्याहत्तर हजारांवर पोहोचलाय. जागतीक आरोग्य संघटनेच म्हणन आहे की कोरोनाची आपत्त्ती आणखी दोन वर्षे राहणार आहे. यामुळे व्यवसायावर बंदी आणुन काहीही साध्य होणार नाही.
अचानक सुट्ट्यांमधे आपण व्यवसाय सुरु केला तर धांदल उडेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील तेव्हा या आपत्तीकाळात त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा याचा सराव झालेला नसेल, तर अक्षरश: गोंधळ उडेल. त्यामुळे माथेरान पर्यटकांसाठी आता सुरु केले तर कमी प्रमाणात पर्यटक येतील. विविध नियम, संकेत पाळणे सोपे जाईल व या नविन पद्धतीने वागण्याचा सराव होईल. ज्या गोष्टींची काळजी घ्यायचीय त्यांची सवय होईल. त्यामुळे शासनाने आता हाॅटेल व लाॅज सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ई पास रद्द केला आहे. त्यामुळे आपल्याला आता कोणतेही वेगळे निर्बंध लादता येणार नाहीत हे केंद्र सरकारने चार दिवसांपुर्वीच स्पष्ट सांगीतल आहे. दुकाने सुरु करण्यास अगोदरच परवानगी दिलेली आहे. घोडे, रिक्षा, कुली, स्टाॅल्स,हाॅटेल, इत्यादी व्यवसाय सुरु होतील. सर्वांचे उत्पन्न सुरु होईल. ते फार आवश्यक आहे.
नागरीकांनी स्वत:च्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी. सर्वांनी सार्वजनीक ठिकाणी मास्क लावुन तोंड व नाक झाकुन घ्यावे. सॅनिटाईझरची छोटी बाटली खिशात ठेवावी व ठराविक कालावधीनंतर हात सॅनिटाईज करावेत. साबणाने हात धुवावेत.
दररोज सकाळ संध्याकाळ मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या कराव्यात व नाकात पाच मिनिटे वाफ घ्यावी.
सकस ताजा आहार घ्यावा.
विटामिन सी, डी व झींकच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात.
या व इतर मार्गदर्शक सुचना आरोग्यविभाग वेळोवेळी देत असते त्यांचे काटेकोर पालन करु यात व पुनश्च व्यवसायासही सुरुवात करु यात.
मनोज खेडकर -- माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष माथेरान
१८ मार्चला माथेरान लॉक डाऊन होहून सहा महिने झाले हातांवर कमवणाऱ्या लोकांचे खूप हाल झाले आहेत पर्यटनांवर अवलुबन असणारे माथेरान आता पर्यटकांचे वाट पाहत आहे शेवटी जगणं हे कोरोना संगतीच आहे प्रत्येकानी आपआपली काळजी घ्यावी.आणि व्यवसाय सुरू केले पाहिजेत.
राकेश कोकळे -अध्यक्ष धनगर समाज माथेरान
राज्य सरकारने ई पास रद्द केला आहे व हॉटेल्स व लॉजेस ना सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने माथेरानचे पर्यटन योग्य ती काळजी घेत सुरू झाले पाहिजे अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यापासून खेडे गावापासून मुंबई पुणे शहरातील व्यवसाय टप्याटप्याने सुरू झाले आहेत कोरोना सोबत जगायचे ठरवल्याने व्यवसाय देखील सुरू करावे लागतील.
सुनिल शिंदे - सामाजिक कार्यकर्ते माथेरान
जिल्हाधिकारी यांनी मार्च महिन्यात लॉक डाऊन करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार आजपर्यंत माथेरान लॉक डाऊन आहे.माथेरान मधील नागरिकांना व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच माथेरान पर्यटकांसाठी खुले करावे याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वरिष्ठांना ६ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे.नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली तर पर्यटकांना प्रवेश देण्यास हरकत नाही.१०ते१५ सप्टेंबरमध्ये माथेरान सुरू करण्याचा आमचा मानस आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लवकरच नागरिकांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होण्यासाठी इथे पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी आम्ही आग्रही असून त्याच प्रयत्नात आहोत.
प्रसाद सावंत
- गटनेते माथेरान नगरपरिषद






Be First to Comment