७ सप्टेंबरला करणार आंदोलन !
सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे )
पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक या सहकारी बँकेत १० वर्षांपूर्वी सुमारे ७५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. सदर बँकेतील सुमारे २ लाख ठेवीदारांना १० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर देखील आज तागायत न्यायालय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी सोमवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
पेण को-ऑपरेटिव्ह बँकचे मुंबईत दादर, गिरगाव व विलेपार्ले असे ३ शाखा तर रायगड जिल्ह्यात १५ शाखा एकूण १८ शाखा होत्या. या बँकेत १ लाख ९८ हजार गोरगरीब ठेवीदारांचे कष्टाचे पैसे जमा होते. परंतु या बँकेत ७५० कोटी रुपयांचा घोटाळा होऊन ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले.
सुमारे १० वर्षांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सदर बँकेवर निर्बंध लादली. त्यामुळे हा घोटाळा समोर आला. यावेळी संबंधित आरोपींवर पोलीस कारवाई सुद्धा करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळासह आरोपींनी जेलची हवा देखील खाल्ली होती.
पेण अर्बन बँक संघर्ष समितीने ठेवीदारांच्या पैसे मिळवण्याकरिता विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने, उपोषणे केली. पेण ते मुंबई चालत लॉंग मार्च काढला. रस्त्यावरील लढाईसह न्याय मिळण्याकरिता संघर्ष समिती मार्फत कोर्टातही दाद मागितली. उच्च न्यायालयाने ठेवीदारांच्या हिताचे आदेशही पारित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चपदस्थ अधिकारी, तपास अधिकारी व ठेवीदार प्रतिनिधी यांची विशेष कृती समिती गठित करण्यात आली. या समितीचे मुख्य कार्य ५९८ कोटी ७२ लाख रुपयांची वसुली व बड्या कर्जदारांवर कारवाई करणे त्याचप्रमाणे बँकेच्या पैशाने विकत घेतलेल्या मालमत्ता ताब्यात घेणे हे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र आजतागायत ५९८ कोटी ७२ लाख रुपयां पैकी केवळ ५ कोटींची वसुली करण्यात आली आहे. अनेक वेळा तर या विशेष कृती समितीची बैठकही वेळेवर होत नाही. यामुळे ठेवीदारांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अखेर या ठेवीदारांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलना दरम्यान सोशल डिस्टंसिंग व कोविड – १९ चे नियम पाळण्यात येणार आहेत.
पेण अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शिशिर धारकर यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील, तत्कालीन आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लेखी पत्र देऊन दरमहा ४० कोटी रुपये वसूल करून देण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांनी आजतागायत कोणतीही रक्कम वसूल करून दिली नाही. त्यामुळे शिशिर धारकर यांच्याकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी केली.
अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपींच्या मालमत्तेचे कोणतेही व्यवहार न करण्याचे आदेश असताना देखील अनेक आरोपींच्या मालमत्तेचे व्यवहार होत आहेत असा आरोप जाधव यांनी केला आहे. त्याच प्रमाणे अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपींनी मागील १० वर्षात सत्तेतील पक्षांमध्ये प्रवेश करून स्वतःवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकारण न करता ठेवीदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.







Be First to Comment