पालीत स्पेशल टास्क टिमची प्रभावी कामगिरी, घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी 🔶🔷🔷🔶
आरोग्य तपासणीत कोणी आजारी आढळल्यास सक्तीने हॊम कोरोंटाईन करणार:- तहसीलदार दिलीप रायन्नावार 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟
सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीत सध्या सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाला लवकर आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.यामध्ये कोणी आजारी आढळल्यास सक्तीने हॊम कोरोंटाईन करणार असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सोमवारी दि. (31) रोजी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्रभागानुसार शासकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी व शिक्षक यांच्या स्पेशल टास्क टीमची निर्मिती केली असून त्याद्वारे योग्य नियोजन करून प्रभावीपणे काम सुरू असल्याची माहिती पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली आहे. आजारी पडल्यास लोकांनी घरी बसू नये ताबडतोब सरकारी दवाखान्यात जावे. खाजगी डॉक्टरांनी देखील कोविड ची लक्षणे असणारा रुग्ण आल्यास ताबडतोब त्यांची कोविड टेस्ट करण्यास सांगावे किवा त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवावे. आणि त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी केले आहे.

रविवारी (दि.30) मिळालेल्या आकडेवारीनुसार सुधागड तालुक्यात 53 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. आणि यातील तब्बल 38 रुग्ण हे पालीतील आहेत. याबरोबरच पालीतील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. परिणामी पालीतील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालीतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी स्पेशल टास्क टिम ची निर्मिती केली आहे. पालीतील प्रत्येक प्रभागात एक ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या सोबत प्रत्येकी 1 सरकारी अधिकारी, 1 आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू), 2 आशा सेविका, 10 शिक्षक आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 अधिकारी नेमले असून युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे.
घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या टीममध्ये कोविड योध्ये बनून तहसीलदार दिलीप रायण्णावार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, सरपंच गणेश बाळके, उपसरपंच विजय मराठे व ग्रामविकास अधिकारी ए. एस. जमधाडे यांच्या देखरेखीखाली ही टीम काम करीत आहेत. घराघरात जाऊन लोकांची तपासणी व माहिती घेतली जाईल. त्याबरोबर आजारी रुग्णांना कोविड टेस्ट, योग्य वैद्यकीय मदत व सुविधा पुरवली जात आहेत. अशी माहीती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली.
कोरोना काळात अशी घ्यावी काळजी
नागरिकांनी आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर कमीतकमी ६०% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरावे, आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळावे, आजारी असलेल्या लोकांशी जवळचा १ मीटरच्या आतला संपर्क टाळावे, आपण स्वत:च आजारी असलात
तर घरीच राहा, खोकताना किंवा शिंकताना रुमालाने, टिश्यूने तोंड झाकून मग तो टिश्यू कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा, वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छता आणि नेहमीचे घरगुती क्लिन्झर वापरून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे, सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घेणे गरजेचे आहे.






Be First to Comment