Press "Enter" to skip to content

उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये महाड दुर्घटनेची पुरावृत्तीची भिती


सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔷🔶🔷🔶

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये काही दिवसांपूर्वी 8 वर्षांपूर्वी बांधलेली 5 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत 16 जणांचा बळी गेला आहे. यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी होत त्यांनी चौकशी सुरू करून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. परंतु अशा निकृष्ट दर्जाच्या इमारती या काही एका दिवसात उभ्या रहात नाही. त्यासाठी कित्येक महिने लागत असतात. त्यावेळी सत्ताधारी, राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणा झोपलेली असते का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

उरण बरोबर या भागात सिडकोच्या माध्यमातून पूर्णपणे समुद्राच्या जवळ व दलदलीच्या भागात उभे रहात असलेले द्रोणागिरी नोडमध्ये भविष्यात महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता भूगर्भ तज्ञांनी व्यक्त केली आहे. तरी या नोडमध्ये सदनिका खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. याची बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

उरण परिसरात नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत व निकृष्ट दर्जाची कामे परवानगी न घेता सुरू आहेत. काहींनी परवानगी घेतली असली तरी घेतलेल्या नियमाप्रमाणे कोणतेच बांधकाम होत नाही. तसेच उरण परिसरात सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची उभारणी जोरात सुरू आहे.

हा नोड मोठा असल्याने बिल्डरलॉबींची चढाओढ सुरू आहे. या भागात इमारती उभारण्याचे जाळे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. द्रोणागिरी नोड हा पुर्णपणे शेत, समुद्र किनारा व दलदलीचा भाग आहे. या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या करताना भूगर्भ तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असताना बिल्डर लॉबीने या सर्वांना तिलांजली देत आपल्या मनमानी प्रमाणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झकमक इमारती उभ्या करीत आहेत. या भुलथापांना भुलत ग्राहक तेथे सदनिका खरेदी करीत आहेत.

आज काही इमारती उभ्या राहिल्या आकर्षक इमारतीकडे ग्राहक आकर्षित होताना दिसत आहे. यामुळे अनेकांनी बिल्डर क्षेत्रात उडी घेत ग्राहकांना भुलवत आज ते बिल्डर करोडपती झाल्याचे चित्र पहावयास मिळते. बिल्डरलॉबींनी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी किराणा दुकाना प्रमाणे मोठमोठी सुसज्ज कार्यालये द्रोणागिरी नोडमध्ये उघडली आहेत. कार्यालयात येणार्‍या ग्राहकांना व्हीआयपी मानसन्मान देणे, इमारतींचे डिझाईनही अत्यंत आकर्षक असते. तसेच मधमाश्यांपेक्षाही गोड मधुर बोलणारी माणसं टीपटॉपने ग्राहकांवर शब्दप्रयोग करीत असतात. चांगला पाहुणचार व मधाळ भाषाशैलीला भुलत अनेक ग्राहकांनी सदनिका अथवा गाळे बुक करून मोठमोठ्या रकमा देऊन मोकळे झाले आहेत.

यानंतर इमारतींच्या बांधकामाला खर्‍या अर्थाने सुरुवात होते त्यावेळी पहाण्यासाठी कोणताच ग्राहक घटनास्थळी किंवा सिडको अधिकारी नसतो. त्यावेळी सदर बिल्डर घेतलेल्या कागदोपत्री नियमांना तिलांजली देत बेकायदेशीर बांधकामाला सुरुवात केली जाते. इमारतींचा पाया मजबूत असणे आवश्यक असताना दलदलीचा काही भाग खोदत त्यावर बिनधास्तपणे कॉलम उभे करतात. त्यानंतर काही महिन्यात इमारतही उभी करतात.

इमारतींचा पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत व तिचे आयुष्यमान वाढते. परंतु या सर्वांना बगल देत बिल्डरलॉबी आपला हेतू साध्य करतात. इमारतींच्या बांधकामांना सुरुवात झाल्यापासून सर्व नियम फाट्यावर मारत इमारतींसाठी लागणारे मटेरियलही निकृष्ट दर्जाचे वापरीत आहेत. एवढेच नाहीतर या भागातील बहुतांश इमारतीं या पुर्णपणे समुद्रा जवळ असल्याने या खार्‍या पाण्याचा वापर करून उभारल्या आहेत.

इमारतींचे बांधकाम सुरू असल्यानंतर
किती खरेदी केलेल्या ग्राहकांनी घटनास्थळी जाऊन बांधकामासाठी कोणत्या दर्जाचे मटेरीयल वापरले याची पहाणी केली. असे ग्राहक फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. याचाच फायदा बिल्डर उचलत इमारत उभी करून सुबक रंगरोटी करून ग्राहकांची मने जिंकताना दिसतात. त्यानंतर बिल्डर ग्राहकांना ताबा देऊन मोकळे होतात. मात्र कोणती दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी घेण्यासाठी बिल्डर सापडणे कठीण होईल.

द्रोणागिरी नोडमधील उभ्या रहाणार्‍या इमारती भूरळ घालण्याचे काम करीत आहेत. सध्या काही ठिकाणी इमारतींचा वापर सुरू झाला असला तरी वर्दळ कमी प्रमाणात आहे. परंतु खर्‍या अर्थाने ज्यावेळी उरणपर्यंत रेल्वे सुरू होईल त्यावेळी रेल्वेच्या व वाढत्या वर्दळीमध्ये इमारतींना धोका पोहचण्यास सुरुवात होऊन काही इमारतीं या दलदलीमुळे जमिनीखाली खचण्यास सुरुवात होईल. त्यानंतरच या नोडमधील इमारती धोकादायक ठरत महाडच्या घटनेची पुनरावृत्ती द्रोणागिरी नोडमध्ये होण्यास सुरुवात होईल त्यासाठी अजून 5 ते 10 वर्षे जातील अशी माहिती भुगर्भ तज्ञांनी पत्रकारांना दिली.

महाड येथील दुर्घटनेनंतर सत्ताधारी व सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी बेंबीच्या देठापासून आरोप-प्रत्यारोप करीत न्याय देण्याच्या डरकाळ्या फोडतात. अशा घटना राज्यात अनेकवेळा घडूनही अशा घटनेत सर्वसामान्यांना न्याय व बिल्डरला शिक्षा अशी एखाद दुसरी घटना असेल अन्यथा सर्वसामान्य न्याय मिळविताना उकीरड्यावर येतो. मात्र अन्याय करणारा कोणातरी राजकीय नेत्यांच्या एसी कार्यालयात उठबस करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.

दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होण्याऐवजी सत्ताधारी, राजकीय पक्ष व शासकीय अधिकारी बांधकाम उभे रहातात असताना कारवाई अथवा आवाज का उठवत नाहीत. त्याला कारणही तसेच कारण ही बिल्डरलॉबी प्रत्येक येणार्‍या निवडणुकीला करोडो रुपयांचा फंड देत असतात. त्यामुळे बिल्डरलॉबींना दुखवणे कोणाच राजकीय पक्षाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे महाड दुर्घटनेतील वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा एखादी दुर्घटना घडल्यानंतर खडबडून राजकीय पक्ष जागे होतील, तोपर्यंत सर्व शांत असेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.