१०८० खासगी व ३ सार्वजनिक बाप्पांचा समावेश 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🌟💠🌟💠
कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर बाप्पांच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांवर अनेक बंधने आल्याने नागोठणे शहर व परिसरातील पाच दिवसांंच्या बाप्पांना साधेपणाने निरोप देण्यात आला.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील पाच दिवसांच्या १०८० खासगी व रिलायन्स टाऊनशीप, कातळावाडी व पिंपळवाडी येथील ३ सार्वजनिक गणपती बाप्पांना तसेच माहेरवासीन असलेल्या ३७५ गौरींना गुरुवारी (दि. २७) भाववपूर्ण निरोप देण्यात आला.
नागोठणे शहर व ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती. बाप्पांची विसर्जन आरती ही आपापल्या घरातच करावी. विसर्जन घाटावर आरती घेऊ नये. तसेच विसर्जन घाटावर येताना कोणीही भाविक लहान मुले व जेष्ठ नागरिक यांना घेऊन येणार नाहीत, त्याच बरोबर बाप्पाची मिरवणूक अगर त्यासोबत कोणीही कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविणार नाहीत. विसर्जन करीता फक्त ४ भाविकांनी यायचे आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्ग अनुषंगाने यावर्षी आपल्याला अगदी साध्या पद्धतीने विसर्जन करावयाचे आहे व शासनाने जाहीर केले नियमावली नुसार नियमाचे पालन करावयाचे आहे असे आवाहन भाविकांना नागोठणे पोलिस ठाण्याकडून करण्यात आल्याने दरवर्षी विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांकडुन पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत, गाजत, नाचत निघणारी बाप्पांची मिरवणूक काढता न आल्याने गणेश भक्तांचा थोडासा हिरमोड झाला.
नागोठणे शहरांत आपल्या लाडक्या बाप्पांना कुणी सजविलेल्या हातगाडीवर, कुणी कारमध्ये तर कुणी टेंपोत सामूहिकरित्या अंबा नदिकिनारील विसर्जन घाटावर आणून निरोप दिला. नागोठणे व परिसरांत तलाव व अंबा नदी यामध्ये बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. नागोठण्यातील खडकआळीसह जोगेश्वरी नगर व इतर आळीतील गणेश भक्तांनी श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरासमोरील तलावातच बाप्पांचे विसर्जन करुन निरोप दिला. नागोठणे पोलीस ठाण्याचे निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सर्व विसर्जन स्थळी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Be First to Comment