सिटी बेल लाइव्ह / उरण (घनश्याम कडू) 🔶🔷🔷🔶
कोणतेही प्रशिक्षण न घेता आपल्या बारा सणांच्या संस्कृतीचे महत्व सांगणारे गणपती जवळील डेकोरेशन साकारले आहे, नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मनस्वी हेमंत म्हात्रे या चिमुरडीने. यामुळे तिच्या पाठीवर अनेकांची कौतुकाची थाप पडत आहे.
उरण चिरनेर गावातील हेमंत आणि प्रेमा म्हात्रे यांची मनस्वी ही कन्या. पनवेलच्या इंदूबाई वाजेकर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती नववीमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या मानस्वीच्या अंगी चित्रकलेचे अंगभूत गुण आहेत.कुठलेही प्रशिक्षण न घेता तिने ही कला आत्मसात केली आहे. मनस्वी म्हात्रे ही सेवानिवृत्त शिक्षक मु. ही. म्हात्रे यांनी नात आहे.
यावर्षी तिने चिरनेर येथिल आपल्या घरी गणपतीच्या मखराची सजावट करण्याची जबाबदारी घेतली. त्यामध्ये तिने आपल्या बारा सणांचे महत्व कसे दिसून येईल याचा विचार करून ते चित्ररूपाने अत्यंत लिलया साकारले. गणपतीच्या मखराची सजावट तर सुंदर झालीच त्याच बरोबर आपल्या संस्कृतीचे महत्वही तिने त्यातून प्रतीत केले. यामध्ये गुढी पाडवा, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, बैलपोळा, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, दसरा, दीपावली, मकरसंक्रांत आदी सणांचा समावेश आहे. तिच्या या अनोख्या संकल्पनेचे अनेकांनी मुक्तकंठाने कौतुक केले आहे. भविष्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून तिला चित्रकलेचे शिक्षण घेण्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे.
Be First to Comment