सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर संक्रात आली आहे. यातून गणरायाचीही सुटका झाली नाही. कधी नव्हे ते यावेळचा गणेशोत्सव सर्वांच्या लक्षात राहणारा असणार आहे. धुमधडाक्यात साजरा न करता अत्यंत साधेपणाने यावेळचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज दीड दिवसांतच घरगुती बरोबर सार्वजनिक गणपतींचेही वाजत गाजत न करता विमला तलावात विसर्जन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायंकाळी ४ वाजल्यापासून गणेश विसर्जनाला अंत्यत शिस्तपद्धतीने सोशल डिस्टन्स पाळत सुरुवात झाली. विसर्जनासाठी मिरवणूकीत गुलाल, फटाकेबाजी हे न दिसता अत्यंत शिस्तपद्धतीने एका गणेशमूर्ती बरोबर फक्त दोघांना परवानगी देण्यात आली होती.
यावेळी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक होते. त्याचबरोबर पुष्पवृष्टी होत नव्हती, गणपतीची आरती घेण्यात येत नव्हती. त्यानंतर सदर मूर्ती विसर्जन करणाऱ्यांकडे सुपूर्द करून ते तलावात विसर्जन करीत होते. त्यानंतर त्वरित येथून गणेशभक्तांना जाण्यास सांगितले जात होते.
यामुळे दरवर्षी गर्दीचा महापूर असणारी कोणतीही गर्दी न दिसता अत्यंत नियोजनपूर्वक गणरायाचे विसर्जन करण्यात येत होते. विशेष म्हणजे सार्वजनिक १० दिवसांच्या गणरायांचे व घरगुती गणरायांचेही विसर्जन आज दीड दिवसांत शांततेने करण्यात आले.
कोरोनाच्या निमित्ताने आज करण्यात आलेले गणरायाचे विसर्जन पाहून सर्व जनतेत समाधान व्यक्त करून अशा प्रकारचे विसर्जन यापुढेही दरवर्षी करण्यात यावे अशी चर्चा गणेशभक्तांत सुरू होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तसेच नगरपालिका, सिव्हिल डिफेन्स आदी कर्मचारी वर्ग मेहनत घेताना दिसत होते.
Be First to Comment