कोरोना संकटकाळात पावसाळ्यातील पोटदुखी डॉक्टरांची डोकेदुखी वाढवणार..
सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / मुंबई – आरोग्य प्रतिनिधी :
मुंबई व लगतच्या शहरांमध्ये मिशन बिगिन अगेन सुरु झाले असून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरी धंद्यासाठी अनेक नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत; अनलॉक झाले असले तरीही आपण अजूनही कोरोनाला हरविलेले नाही. त्यामुळे कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घेणे महत्वाचे आहे.
मिशन बिगिन अगेन सुरुवातीसोबतच पावसाने सुद्धा जोर धरला असून पावसाळ्यातील रोगराईंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे, यामध्ये पाण्यावाटे सर्वाधिक पसरणाऱ्या पाच आजारांमध्ये अतिसार (डायरिया), हिवताप (मलेरिया), विषमज्वर (टायफॉइड), कॉलरा आणि फिलेरियोसिस (फिलेरिया कृमींच्या संसर्गामुळे होणारा आजार) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कावीळ, सर्दी, ताप, डेंग्यु आणि विविध प्रकारचे फुफ्फुसांचे विकार (न्युमोनिया) आढळून येतात.
कोरोना काळात पोटदुखी आणि जुलाबाची लक्षणं दिसत असतील तर कोरोनाची चाचणी करणे महत्वाचे आहे. याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या पोटविकारतज्ञ डॉ सोनाली गौतम सांगतात,” कोरोना संकटाच्या महामारीत हा पावसाळा ऋतू अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे;अनेक महिन्यांनी घराबाहेर पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरी, भेळपुरीच्या गाडय़ा, मसाला डोशांचा वास आपल्याला खुणावू शकतो परंतु रस्त्याकडेच्या गटारातून वाहत असलेले पाणी, आजूबाजूला होत असलेला चिखल, त्या चिखलावर बसून मग गाडय़ांवरील पदार्थावर बसणाऱ्या माशा, उघडे ठेवलेल पाणी!!
हे सर्व वास्तव नजरेआड करू नका. दूषित पाण्याचा स्रोत हा सगळीकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पाऊस पडत असल्याने तहान कमी होत असली तरी पाऊस नसताना मात्र उकाडा वाढतो, घाम बाहेर पडत असल्याने अनेकदा रस्त्यांवरील सरबताच्या गाडय़ांकडे पावले वळतात. त्याचप्रमाणे पोषक आहारासाठी फळांचे रस पिणारेही अनेक आहेत. फळांचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी हे रस तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी किंवा बर्फाचे खडे यांतून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो.
प्रत्येकाची प्रतिकार क्षमता वेगळी असते. काहींना याचा लगेच त्रास होतो, काहींना होत नाही. मात्र या कोरोना महामारीमध्ये काळजी सर्वानीच घ्यायला हवी. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला प्रामुख्याने जी सर्वसाधारण लक्षणं दिसून येत आहेत तीं लक्षणं काही रुग्णांमध्ये दिसत नाहीत. पोटदुखी आणि डायरिया असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या काही केसेस राज्यात दिसून येत आहेत म्हणूनच पावसाळ्यातील पोटदुखी आता डॉक्टरांची डोकेदुखी ठरणार आहे.”
कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही दुखणं अंगावर काढू नका असा सल्ला यापूर्वी दिला होता. आताही कोव्हिड-१९ वॉर्डमध्ये वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर वेळेत टेस्ट करा असंच सांगत आहेत. पोटदुखी, जुलाब ही कोरोनाची प्रमुख लक्षणं नसली तरी सतर्क रहायला हवं. त्या आजाराची औषध घेऊनही दोन ते तीन दिवसांत त्रास होणं थांबत नसेल तर कोरोनाची टेस्ट करुन घ्या.” असंही सायन रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सर्व रुग्णालयात रूग्णांची उपचारासाठी रांगाच रांग लागलेली असते. परंतु, यंदाच्या वर्षी बहुतांश रूग्णालये कोविड-१९ रूग्णांसाठी देण्यात आली आहेत. यामुळे सर्वसाधारण पोटदुखीच्या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्याऐवजी घरीच उपचार दिले जात आहेत, म्हणूनच कोरोना महामारीत या पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजारांपासन वाचण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे.






Be First to Comment