
प्रियांका बर्वे यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध; वैभव जोशी यांच्या आशयघन काव्यरचनांनी रंगली मैफल



लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
पनवेल (हरेश साठे) दिवाळीचा उत्सव म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सोहळा! या आनंदोत्सवाला संगीताचे सूर आणि कवितांच्या शब्दांची सुरेख किनार लाभली आणि पनवेलच्या वडाळे तलाव परिसरात सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) पहाटे अवघे वातावरण स्वरमय झाले. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट २०२६’ या नवव्या वर्षातील सांस्कृतिक सोहळ्याला हजारो रसिकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर स्वरांनी आणि सुप्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी यांच्या आशयघन काव्यरचनांनी या पहाटेचे सौंदर्य अधिकच खुलवले.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात वडाळे तलावाच्या निसर्गरम्य परिसरात रंगलेल्या या सोहळ्याने पनवेलकरांना संगीत, साहित्य आणि संस्कृतीचा अविस्मरणीय अनुभव दिला. दिवाळीच्या धामधुमीत काही क्षण थांबून सुरेल गीतांचा आणि उत्तम कवितांचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळाली. मराठी संस्कृतीतील दिवाळी पहाटेची परंपरा जपत पनवेलमध्ये गेली नऊ वर्षे हा सांस्कृतिक उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे. यंदाही नागरिकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेला भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उपायुक्त गणेश शेटे, सभागृहनेते अॅड. प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, प्रभाग समिती सभापती मधू पाटील, अजय बहिरा, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, भाजपचे शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
प्रियांका बर्वे यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध!कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गायिका प्रियांका बर्वे यांनी आपल्या सुरेल, भावपूर्ण आणि प्रभावी आवाजाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ‘तुझं मागतो मी आता’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘शायद फिर इस जनम’, ‘इन आँखों की मस्ती में’, ‘तुझे चाँद के बहाने देखूँ’, ‘मी तर स्वामिनी तुझी’, ‘मी डोलकर डोलकर रं डोलकर दर्याचा राजा’, ‘रेश्माच्या रेघाने’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा लोकप्रिय मराठी, हिंदी आणि भक्तिगीतांची सुरेल बरसात त्यांनी केली. प्रत्येक गीतासोबत रसिकांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद यामुळे संपूर्ण परिसर संगीताच्या आनंदलहरींनी भारावून गेला. विविध भावछटांनी नटलेल्या त्यांच्या गायनाने पहाटेच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली.

वैभव जोशी यांच्या शब्दांनी जिंकली रसिकांची मने!संगीताच्या या सुरेल मैफलीला काव्याचीही तितकीच समृद्ध जोड लाभली. सुप्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी यांनी आयुष्य, निसर्ग, संस्कृती आणि भक्ती अशा विविध विषयांवरील आशयघन आणि भावस्पर्शी काव्यरचना सादर केल्या. आपल्या शब्दांतून त्यांनी मानवी भावभावना, जीवनातील अनुभव, निसर्गाचे सौंदर्य आणि संस्कृतीचे विविध पैलू उलगडले. कधी विचार करायला लावणाऱ्या, कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी मनाला प्रसन्न करणाऱ्या त्यांच्या काव्यरचनांना रसिकांनी मनापासून दाद दिली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला साहित्यिक समृद्धी लाभली आणि संगीतासोबतच कवितेचीही रसिकांना अनोखी मेजवानी अनुभवता आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी कलाकारांचे स्वागत केले, तर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिकांचे आभार मानले.
संगीत आणि साहित्याचा सुरेख संगम!दिवाळी पहाट म्हणजे केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे, तर नव्या दिवसाची आणि नव्या वर्षातील उत्साहाची सुरेल सुरुवात असते. पहाटेच्या शांत वातावरणात संगीताचे स्वर मनाला प्रसन्न करतात, तर कवितांचे शब्द विचारांना नवी दिशा देतात. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने मनोरंजनासोबतच सांस्कृतिक अभिरुची जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. एका बाजूला प्रियांका बर्वे यांच्या स्वरांची मोहिनी आणि दुसऱ्या बाजूला वैभव जोशी यांच्या शब्दांची जादू, अशा दुहेरी मेजवानीने यंदाची दिवाळी पहाट पनवेलकरांसाठी विशेष स्मरणीय ठरली. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रायोजकत्वाखाली पार पडलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेलकरांच्या कला, संगीत आणि साहित्याविषयीच्या प्रेमाची साक्ष देणारा ठरला. दिवाळीच्या मंगलमय पर्वात स्वर, शब्द आणि संस्कृतीचा आनंदोत्सव साजरा करत नवव्या वर्षातील ‘दिवाळी पहाट २०२६’ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.



Be First to Comment