Press "Enter" to skip to content

दिवाळीत खोपोली पोलिसांची ३० नागरिकांना अनोखी भेट ; हरवलेले ३० स्मार्टफोन शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन, मोबाईल पुन्हा हाती मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य

खोपोली : दिवाळी म्हणजे आनंदाची देवाणघेवाण आणि भेटवस्तूंची बरसात. मात्र, एखाद्याची हरवलेली जिव्हाळ्याची वस्तू पुन्हा त्याच्या हाती देण्याचा आनंद काही औरच असतो. खोपोली पोलिसांनी याच भावनेचा प्रत्यय देत हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल ३० मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. विशेष म्हणजे हे सर्व अँड्रॉइड आणि स्मार्टफोन होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुन्हा हाती आलेल्या आपल्या मोबाईलमुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते. अनेकांसाठी ही केवळ मोबाईल परत मिळण्याची घटना नव्हती, तर हरवलेल्या आठवणी, महत्त्वाचे दस्तऐवज आणि जिव्हाळ्याचा ठेवा पुन्हा मिळाल्याचा सुखद अनुभव होता.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या तसेच चोरीला गेलेल्या मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींच्या आधारे ही विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

केंद्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या CEIR आणि CIAR या पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास व पाठपुरावा करून हे ३० मोबाईल हँडसेट शोधण्यात यश आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात दिली. या शोधमोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी आकाश डोंगरे, निलेश कांबळे, प्रशांत दबडे, रामा मासाळ, अमोल राठोड, किरण देवकाते, सुमित पवार आणि शुभम जाधव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः आकाश डोंगरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत मोबाईल शोधण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.

मोबाईल परत मिळाल्यानंतर संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या संपूर्ण मोहिमेतील सर्वात मोठा पुरस्कार ठरला. एखादी वस्तू हरवली की तिच्यासोबत तिच्याशी निगडित अनेक आठवणी आणि महत्त्वाची माहितीही हरवल्यासारखी भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत पुन्हा तोच मोबाईल हातात मिळणे म्हणजे मनावरील एक मोठे ओझे हलके होण्यासारखे आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात पोलिसांनी दिलेली ही भेट अनेकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.

यावेळी खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते भरत मिश्रा यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले. पोलिसांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आपल्यासह इतर नागरिकांनाही त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच या संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन केले. या मोहिमेत विशेष पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस कर्मचारी आकाश डोंगरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तपासातील सातत्य आणि नागरिकांच्या तक्रारींबाबतची संवेदनशीलता यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. दिवाळीच्या निमित्ताने खोपोली ३० नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलवलेला आनंद आणि पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणारी माणुसकीची अनोखी भेट होती.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.