
४६ वर्षीय आरतीदेवी फाटक हिच्या मृत्यूचे गूढ उकलले;२९ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंधातून घडल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न
रसायनी (आनंद पवार)
खालापूर तालुक्यातील मोहोपाडा-वासांबे परिसरात एका ४६ वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आरतीदेवी देवेंद्र फाटक असे मृत महिलेचे नाव असून,या प्रकरणी संजय रामनारायण कुशवाहा (वय २९,मूळ रा.भटई दरीया टोला,कुशीनगर,उत्तर प्रदेश) याला रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.मृत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, याच संबंधातून हा खुनाचा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरतीदेवी फाटक ही,मोहोपाडा येथील वासांबे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या साई दर्शन इमारतीत पतीसह वास्तव्यास होती.३०
ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा घरातच अचानक मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेची रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.मात्र, महिलेच्या मृत्यूच्या परिस्थितीवरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.या तपासादरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली.आरोपी संजय कुशवाहा हा पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता.मृत आरतीदेवी हिचे पती देवेंद्र फाटक हा त्याच कंपनीत संजयच्या हाताखाली काम करीत होता.या कामाच्या निमित्ताने देवेंद्र आणि संजय यांच्यात मैत्री निर्माण झाली.त्यानंतर संजयची देवेंद्रची पत्नी आरतीदेवी यांच्याशी ओळख वाढली.कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

दरम्यान,३०ऑक्टोबर रोजी आरतीदेवी हीच्या मृत्यूच्या दिवशी आरोपी संजय कुशवाहा याने त्यांचा पाठलाग केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी,संशयित हालचालींची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.या तपासातून आरतीदेवी हिच्या मृत्यूमागील संशय अधिक बळावला.
पोलिसांनी संजय कुशवाहा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,आरतीदेवी हिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास करताना रसायनी पोलिसांनी संशयास्पद बाबींचा मागोवा घेत मृत्यूमागील कथित खुनाचा उलगडा केला.
या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत आहेत.प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका विवाहित महिलेचा जीव गेल्याच्या या घटनेमुळे मोहोपाडा-वाशांबे परिसरात खळबळ उडाली आहे.



Be First to Comment