Press "Enter" to skip to content

“सिटी बेल” एडिटर्स लाइन्स…

दिवाळी विशेषांक…. एक समृद्ध अडगळ !

      वाचक मित्रहो ! पूर्वी दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्याच्या पाठीमागे एक उदात्त आणि समाज उत्कर्ष साधणारी भूमिका असायची.माझ्या वडिलांच्यामुळे दिवाळी विशेषांक प्रसिद्धीच्या प्रक्रियेत मी अगदी शाळकरी वयापासून ओढलो गेलो. थोर संपादक स्वर्गीय लक्ष्मण पांडुरंग वालेकर यांनी पनवेलकरांचे आपले, स्वतःचे नियतकालिक प्रसिद्ध करण्याच्या हेतून किल्ले रायगड या नियतकालिकाची मुहूर्तमेढ रोवली. शासकीय सेवेत असल्यामुळे सिंहाचा वाटा असून देखील माझ्या वडिलांनी त्याचे श्रेय कधीच घेतले नाही.असे असून सुद्धा हे नियतकालिक आपलेच आहे या भूमिकेतून "ते" आणि त्यांच्यामुळे "मी" किल्ले रायगडच्या दिवाळी विशेष अंक प्रसिद्धीच्या प्रक्रियेचा एक भाग असायचो. आजच्या परिस्थितीत दिवाळी विशेष अंक जाहिरातदारांच्या उरात धडकी भरवतात.आज मास मीडिया तज्ञ म्हणून दिवाळी विशेषांकांच्या प्रसिद्धीबाबत २०२६ साली सदर विशेषांकांचा ऊहापोह करताना एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते... ते म्हणजे आज कुठेतरी समाजाला दिवाळी विशेषांक हे एक समृद्ध अडगळ वाटू लागले की काय ? ही भावना प्रकर्षाने मनाचा ताबा घेते.

दिवाळी विशेषांक हा साधारणपणे नव्वदच्या दशकाचे अंताचे पर्यंत आपला आब, रुबाब, आणि रुतबा सांभाळून प्रसिद्ध व्हायचे. चोखंदळ वाचकांना आवडतील - भावतील असे दर्जेदार लेख, विश्लेषण, कविता, व्यंगचित्र दिवाळी अंकांमध्ये अंतर्भूत असायचे. के. गो. लिमये वाचनालयासह तमाम महाराष्ट्रातील वाचनालयांच्यामध्ये दिवाळी अंक वाचता यावेत म्हणून विशेष योजना राबविल्या जायच्या. कुठलेही दर्जेदार साहित्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी खर्च हा लागणारच! अर्थातच दिवाळी अंकांसाठी देखील तो लागतोच! तमाम प्रथितयश वृत्तपत्र दिवाळी अंकाचा खर्च परवडावा म्हणून त्यामध्ये नगरशेठ, जमीनदार, घरंदाज, व्यावसायिक, राजकारणी यांच्या दीपावलीच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करत असत. दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या अनुषंगाने बऱ्याच व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचता यायचे. राजकारणी लोकांना त्याकाळात दिवाळी अंक म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे समृद्ध साधन वाटायचे.

एकविसाव्या दशकाच्या प्रारंभी तांत्रिक क्षेत्रामध्ये अभुतपूर्व बदल होऊ लागले. वृत्तपत्रांमध्ये बातम्या देण्यासाठी फॅक्सच्या ऐवजी ईमेल सक्रिय झाले. तांत्रिक प्रगतीमुळे जग जवळ येऊ लागले. अर्थातच या सगळ्याचा इम्पॅक्ट वृत्तपत्रांच्या दिवाळी अंकांवरती देखील होऊ लागला. इंटरनेट, मुबलक आणि स्वस्त छपाई यंत्रणा यांच्यामुळे कोणीही सोम्या गोम्या दिवाळी अंक प्रसिद्ध करू लागला. ज्यांचा वृत्तपत्र प्रसिद्धी व्यवसायाशी सुतराम संबंध नाही असे हौशी देखील दिवाळी अंक छापू लागले.प्रसिद्ध झालेल्या दिवाळी अंगावर आर.एन.आय. ने दिलेला परवाना क्रमांक आहे की नाही याची खातरजमा न करता जाहिरातदार जाहिराती देऊ लागले. कधी या जाहिराती ओळखीपोटी दिल्या गेल्या,कधी आज ना उद्या जाहिरात घेणारा आपल्या कामी येईल या भावनेतून दिल्या गेल्या, अनेकांना देतो तशी याला पण छोटीशी जाहिरात देऊन टाकू या भावनेतून देखील दिल्या गेल्या.

येथूनच काळ सोकावायला लागला. म्हातारी मेल्याचे दुःख कधीच नव्हते पण जाहिरातदाराच्या खिशाला मर्यादा तर होत्याच ना? वर्षभर राब राब राबून बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्र व्यावसायिकांना दिवाळी अंकाचा रेवेन्यू कोणाहीसोबत शेअर करताना यातना होत आहेत.अनेक प्रथितयश नियतकालिके प्रसिद्ध करणारे "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" सहन करत आहेत. आज पेड न्यूजचा जमाना आहे, आम्ही त्या काळामध्ये पत्रकारिता केली आहे, जेव्हा बातमी छापण्या करता फुटकी कवडी देखील मिळायची नाही. वर्षभर दिलेल्या प्रसिद्धीच्या बदल्यात दिवाळी अंक आणि नियतकालिकाचा वर्धापन दिन या दोन जाहिराती घेणे हा आम्ही आमचा हक्क समजत असू.आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.आज कुणीही हजार-पाचशे रुपयांमध्ये "बुम" बनवून घ्यावा आणि बाईट देण्याच्या नावाखाली समोरचा जे बोलेल,जसे बोलेल ते सोशल मीडिया वरती व्हायरल करणाऱ्यांना देखील "पत्रकार" संबोधले जाते.(अर्थात या बातमीला किती व्ह्यूज मिळतात हा संशोधनाचा विषय आहे ) अशा वेळेस "याचसाठी का केला होता अट्टाहास ???" हा प्रश्न मनामध्ये सतत उमटत राहतो.

कित्येक दिवाळी अंक एकाच डी टी पी डिझायनर कडे छापले जातात. कॉम्प्युटर मधील कंट्रोल C आणि कंट्रोल V या तंत्रज्ञानामुळे कोणीही कोणाचेही वाङ्मय सहज उचलू (चोरू ) शकतो. म्हणूनच सजग साहित्य जसेच्या तसे अनेक दिवाळी अंकांमध्ये पाहायला मिळते. जाहिरातदारांच्या जाहिरातीचे डिझाईन सुद्धा सगळ्या दिवाळी अंकांमध्ये एकाच टाईपचे असते. अशा परिस्थितीत हे दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचतात किती? आणि वाचक ते वाचतात किती? याचे संशोधन न केलेलेच बरे!

सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही अत्यंत खडतर आणि संघर्षमय परिस्थितीमध्ये पनवेल महानगरीमध्ये होणारे स्थित्यंतर ध्यानात घेता इंग्रजी भाषेमध्ये नियतकालिक प्रसिद्ध करत आहोत. कोरोना विषाणूच्या कालखंडामध्ये "शो मस्ट गो ऑन!" आणि त्यानंतर पोस्ट "पँडेमिक इन्व्हेस्टमेंट" या आर्थिक विषयावरती दिवाळी विशेष अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर सलग तीन वर्ष क्रीडा विशेषांक, शैक्षणिक विशेषांक, इंटिरियर डिझाईनिंग दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केल्यानंतर यंदाचे वर्षी आपल्या देशाचा अनादी-अनंत कालापासूनचा प्रवास अधोरेखित करणारा "जर्नी ऑफ इंडिया" हा दिवाळी विशेष अंक प्रसिद्ध करत आहोत. अत्यंत दुर्दैवानं नमूद करावसं वाटतं की दिवाळी अंकांच्या साटमारीमध्ये कित्येक मित्र, सुहृद मंडळी,राजकारणी लोकं...माझे आणि माझे सहकारी विवेक मोरेश्वर पाटील यांचे फोन उचलत नव्हते. जाहिरात मागितली तर नाही कसे म्हणावे? कदाचित ही विवंचना असावी! बरे...यातील कित्येकांची राजकीय आणि व्यावसायिक करिअर घडविण्यामध्ये आम्हा उभयतांचा सिंहाचा वाटा आहे. असो! परंतु त्यांच्या अंतर्मनातील unsaid voice ओळखून आम्हीही "इदम न मम" ही भूमिका घेतली.

एक पत्रकार,लेखक, मास मीडिया एक्सपर्ट आणि विश्लेषक या भूमिकेतून मला आज परखडपणे ही भूमिका मांडवीशी वाटते की मनोरंजन, माहिती संकलन, प्रबोधन, सर्वेक्षण या जटीलकामी आता आपल्याला अंक अथवा पुस्तके चाळायाची गरज नाही. हातातील स्मार्टफोनमध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकांचे महात्म्य कमी होणे क्रमप्राप्त आहे. केवळ प्रसिद्धीचा हव्यास यापलीकडे या साहित्यकृतीमध्ये दम राहिलेला नाही !!!! म्हणूनच उद्वेगाने नव्हे तर सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवून एक निरीक्षण नोंदवत आहे ते म्हणजे "दिवाळी विशेषांक.... एक समृद्ध अडगळ!" बनू लागले आहेत. मला अथवा विवेकला बातमी प्रसिद्ध करण्यासाठी पाठविणाऱ्यांनी उपरोक्त अनुभवाची दखल घ्यावी. Change is the constant thing! यावर आमचा प्रचंड विश्वास आहे. कालानुरूप बदल अंगीकारण्यात आम्ही अग्रस्थानी असतो हे आपण जाणताच! परंतू ही समृद्ध अडगळ कशासाठी सांभाळायची? याचे उत्तर शोधताना आम्ही असे ठरविले आहे की "येथून पुढे दिवाळी विशेष अंक प्रसिद्ध करायचा नाही!!!" या उद्घोषणेमुळे एक गोष्ट चांगली होईल की.... येथून पुढे आमचे फोन उचलताना कोणाच्याही उरामध्ये धडकी भरणार नाही!

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.