Press "Enter" to skip to content

सुरांच्या साथीने रंगली दिवाळी पहाट ; ब्राह्मण सभा खोपोलीच्या ‘सुर निरागस हो’ प्रस्तुत ‘स्वरानुभव’ मैफलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद

खोपोली, दि. 7 नोव्हेंबर 2026 : पहाटेच्या प्रसन्न वातावरणात स्वरांची बरसात, सुरेल गीतांची मेजवानी आणि रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… अशा चैतन्यमय वातावरणात ब्राह्मण सभा खोपोलीच्या वतीने कै. विमल ताई मुकुंद बिवरे सभागृहात दिवाळी पहाटेचे औचित्य साधून ‘सुर निरागस हो’ प्रस्तुत ‘स्वरानुभव’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित रसिकांचे कपाळी गंध लावून आणि अत्तराचा सुगंध देऊन स्वागत करण्यात आले.

भूपाळीपासून भैरवीपर्यंतचा सुरेल संगीतप्रवास घडवणाऱ्या या मैफलीत भावगीते, भक्तिगीते, अभंग आणि लावणी अशा विविध गीतप्रकारांची बहारदार मेजवानी रसिकांना अनुभवता आली.

‘पावसाळी रंग तुझा’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘केतकीच्या बनी नाचला गं मोर’, ‘मर्मबंधातली ठेव ही’ आणि ‘जोहार मायबाप जोहार’ यांसारख्या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर ‘कळीदार कपूरी पान’ या लावणीच्या सादरीकरणावेळी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजराने सभागृह अक्षरशः दुमदुमून गेले. ढोलकी आणि संवादिनीच्या सुरेल साथीने प्रत्येक गीताला वेगळीच रंगत प्राप्त झाली.

मैफलीच्या अखेरच्या टप्प्यात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रकाशयोजना आणि ध्वनियंत्रणा बंद पडली. मात्र, या अनपेक्षित अडथळ्याने कलाकारांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. कोणत्याही तांत्रिक सुविधेची पर्वा न करता त्यांनी आपले सादरीकरण सुरूच ठेवले. संगीताप्रती असलेली निष्ठा आणि कलेवरील प्रेम यांचा प्रत्यय देणाऱ्या या प्रसंगाने मैफलीतील रंगत आणखी वाढवली. अखेरीस ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या भैरवीने या सुरेल मैफलीची भावपूर्ण सांगता झाली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही “संगीतमय पहाटची” मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. विविध गीतप्रकारांची सुरेल गुंफण, कलाकारांचे भावपूर्ण सादरीकरण आणि रसिकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद यामुळे दिवाळीच्या मंगलमय पहाटेचा हा संगीतसोहळा खोपोलीकरांसाठी संस्मरणीय ठरला. या आयोजनाच्या यशस्वितेसाठी ब्राह्मण सभा खोपोलीचे अध्यक्ष राजेंद्र पेठे, सचिव वृषाली बेलसरे यांच्यासह कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.