
दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कारसह ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
रसायनी (आनंद पवार)
रायगड जिल्ह्यात अवैध शस्त्रांची विक्री आणि बेकायदेशीररीत्या गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत प्रीती पॅलेस हॉटेलसमोर आलेल्या एका तरुणालास्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून जेरबंद केले.या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे कट्टे,दोन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार असा एकूण ७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध शस्त्रविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम गावठी कट्टे विक्री करण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या प्रीती पॅलेस हॉटेलसमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.या माहितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी पथकासह तत्काळ कारवाईचे नियोजन केले.त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी गोपनीयरीत्या सापळा रचला.संशयित इसम घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी योग्य संधी साधत त्याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती तसेच वाहनाची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.तसेच त्याच्या ताब्यातील एर्टिगा कारही पोलिसांनी जप्त केली.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे संशयिताला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम उल्हास पाटील (वय २८,व्यवसाय चालक),रा. पार आळी,शहापूर, ता.अलिबाग,जि. रायगड असे आहे. विशेष म्हणजे,या आरोपी विरोधात यापूर्वी पोयनाड पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२),११८(१),११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात या धडाकेबाज कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,सहाय्यक फौजदार संदीप पाटील,पोलीस हवालदार रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत,शरद फरांदे,रणजितसिंह खराडे,मनोहर सिरतार तसेच पोलीस शिपाई प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला.गावठी कट्ट्यांसारखी घातक शस्त्रे विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली ही नियोजनबद्ध कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.केवळ शस्त्रे जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न राहता या शस्त्रांच्या पुरवठादारांपर्यंत आणि संभाव्य खरेदीदारांपर्यंत तपास पोहोचणे आवश्यक आहे.त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




Be First to Comment