Press "Enter" to skip to content

के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथा लय- इमारतीच्या भूमी-पूजन व पायाभरणी समारंभ संपन्न

पनवेल दि.१८(प्रतिनिधी): “तोपर्यंत गावचा विकास होत नाही,जोपर्यंत गावात ग्रंथालय उभे राहत नाही.”अशा परखड शब्दात ज्येष्ठ गजलकार,साहित्यिक व माजी सनदी अधिकारी डॉ. ॲड.दिलीप पांढरपट्टे यांनी काढले.येथील के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथा लय- इमारतीच्या भूमी-पूजन व पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,”पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. संस्कृतीची निशाणी आहे. काही कारणामुळे वाचनालय उध्वस्त झाले,तर नागरिक जिवापाड मेहनत घेऊन वाचनालय पूर्वीसारखे उभे करतात.”यासाठी त्यांनी श्रीलंकेमधील जाफना शहराचा दाखला दिला.बॉम्ब हल्ल्यामुळे उध्वस्त झालेल्या जाफना शहरात सर्वप्रथम ग्रंथालयाची टोलेजंग इमारत तत्परतेने उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले,”सर्व भाषा आपल्या भगिनी आहेत.उर्दू भाषा देखील आपली आहे. कारण हिंदीमध्ये अरबी व फारशी शब्दांच्या मिलाफाने ती तयार झाली आहे.”शेवटी त्यांनी ग्रंथालयाच्या या प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवर माजी खासदार रामशेठ ठाकूर, महापौर नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, दिलीप पांढरपट्टे,इमारतीचे वास्तुशिल्पी मंदार नाडगोडी, प्रथम देणगीदार सुधीर कांडपिळे,वाचनालयाचे माजी अध्यक्ष अनंत सिंगासने, शशिकांत बांदोडकर व ए.के. शेख सर,के.गो.लिमये यांची नात दीपा पाटणकर, पनवेल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत गुर्जर,रायगड जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय बोंदार्ँडे,माजी सनगरसेवक रमेश गुडेकर,दर्शना भोईर व निर्मला म्हात्रे,ज्येष्ठ वाचक व हितचिंतक दत्तात्रेय जाधव या सर्वांचे शाल,बुके व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांनी टिकावाच्या सहाय्याने सांकेतिक खोदाई केली.
वाचनालयाच्या अध्यक्ष्या ॲड.सुनिता जोशी यांनी प्रास्तविकात वाचनालयाची वाटचाल अनोख्या शैलीत कथन केली.

इमारतीचे वास्तु शिल्पी मंदार नाडगौडी यांनी ” वाचनालयाच्या स्वमालकीच्या साडेचार गुंठे जागेत एकूण दहा हजार चौरस फुटाची, चार मजली व पाच कोटी रुपये किमतीची आलिशान इमारत उभी राहणार आहे. इमारतीचा दर्शनी भाग आकर्षक असून एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाप्रमाणे घेण्यात आला आहे.” हे नमूद केले.
मान्यवरांपैकी जे.एम. म्हात्रे,नितीन पाटील, रामशेठ ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,, “इमारतीच्या उभारणीत आमचा आवश्यक तेथे निश्चित सहभाग असेल.”

या कार्यक्रमप्रसंगी कमळपतपेढीच्या अध्यक्षा मालती आंग्रे,को.म.सा.प. पनवेल व नवीन पनवेलचे अध्यक्ष गणेश कोळी व सुभाष कुडके, जनजागृती ग्राहक मंच पनवेलचे अध्यक्ष सुभाष फडके, संस्थापक के. एस. पाटील यांच्यासोबत अनेक संस्थांचे प्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक व सुजाण वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन युवा-साहित्यिक विशाल पवार यांनी शैलीदार व अलंकारिक भाषेत केले. त्यांच्या सूत्र-संचालनात समर्पक मराठी सुभाषितांची रेलचेल होती.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ साहित्यिक, माजी शिक्षण संचालक व वाचनालय सदस्य रोहिदास पोटे यांनी ओघवत्या भाषेत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कार्यकारणी सदस्य,कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.