
रसायनी — राकेश खराडे
रायगड जिल्ह्यातील रसायनी परिसरातील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील दांडफाटा येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री टाकेदेवी माता देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात श्री टाकेदेवी मातेच्या तिसऱ्या माळेचा व आरतीचा मान ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश काशिनाथ खराडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. या मानाच्या पूजाविधीत खराडे कुटुंबीयांनी भक्तिभावाने सहभागी होत आई टाकेदेवीची आरती केली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील नेते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर श्री टाकेदेवी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. आयपीएस अधिकारी जे. जयकुमार यांनीही आपल्या कुटुंबीयांसमवेत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होऊन नवसपूर्ती करतात. त्यामुळे नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इर्शालगडाशी जोडलेली देवीची आख्यायिका
स्थानिक श्रद्धेनुसार, जागृत टाकेदेवी मातेचे मूळ स्थान इर्शालगडावर असल्याचे सांगितले जाते. दांडफाटा येथील पाण्याच्या कुंडाशीही देवीची आख्यायिका जोडलेली आहे. पूर्वी या कुंडाजवळ देवीचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
स्थानिकांकडून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार, देवीच्या दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांना जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी या कुंडातून पाण्यावर तरंगत बाहेर येत असत. या आख्यायिकेमुळे टाकेदेवी मातेच्या देवस्थानाबद्दल भाविकांच्या मनात विशेष श्रद्धा आणि भक्तिभाव आहे. या कथा स्थानिक लोकपरंपरेचा आणि श्रद्धेचा भाग म्हणून आजही सांगितल्या जातात.
नवसाला पावणारी माता म्हणून ख्याती
श्री टाकेदेवी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात या राज्यांतूनही भाविक येत असल्याचे सांगितले जाते. कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि जीवनात आनंद लाभावा, या श्रद्धेने भाविक देवीचे दर्शन घेतात. नवरात्रोत्सवातील पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक विधींमुळे देवस्थान परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
दांडफाटा येथील श्री टाकेदेवी माता देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून स्थानिकांच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली देवीवरील श्रद्धा, नवसपूर्तीची परंपरा आणि नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरण यांमुळे या देवस्थानाचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे.





Be First to Comment