
पनवेल (प्रतिनिधी) मराठी भाषा, संतसाहित्य आणि संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा उलगडणारा ‘मराठी माझी देवालाही आवडे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रण निमंत्रक म्हणून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाविषयी माहिती देत मराठी भाषेचा अभिजात वारसा आणि संतसाहित्याची समृद्ध परंपरा जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्यकारिणी सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, संजय सोनावणे, सचिव हरेश साठे, खजिनदार दत्तात्रेय कुलकर्णी, प्रवीण मोहोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संतसाहित्य आणि संगीताच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषेचा सांस्कृतिक प्रवास रसिकांसमोर उलगडणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मराठी भाषेतील भक्तिरचना, संतवाङ्मय आणि संगीतपरंपरेतील भावसौंदर्य यांचा सुरेल संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. मराठी भाषेची थोरवी, संतांच्या विचारांचा अमूल्य ठेवा आणि संगीताची भावस्पर्शी परंपरा यांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.




Be First to Comment