
तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी २१ वर्षीय तरुणाला रसायनी पोलिसांकडून अटक
रसायनी (आनंद पवार)
मोहोपाडा आळी-आंबिवली येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून रसायनी पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून,अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,सोमवार,दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास मोहोपाडा आळी-आंबिवली येथील स्वामी समर्थ मठाजवळ राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलीच्या घरात घुसून तिच्या कानशिलात मारत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार रसायनी पोलिसांकडे करण्यात आली.पीडित मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली.या प्रकरणी नवीन पोसरी,मोहोपाडा येथील सचिन भारत चव्हाण(वय २१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ३३२,११५(२), ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम ८, ५(पी) व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अल्पवयीन मुलीशी संबंधित या गंभीर घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Be First to Comment