Press "Enter" to skip to content

संतसाहित्य आणि संगीताच्या माध्यमातून उलगडणार अभिजात मराठीचा सुवर्णप्रवास

‘मराठी माझी देवालाही आवडे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे १७ ऑक्टोबर रोजी पनवेल येथे आयोजन; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

पनवेल (प्रतिनिधी)मराठी भाषा, संतसाहित्य आणि संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा उलगडणारा ‘मराठी माझी देवालाही आवडे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात कल्पिता राणे नृत्य सादर करणार असून, डॉ. राम पंडित आणि तन्वी गोरे गायन सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन कल्पिता राणे यांचे असून, कल्पिता राणे व कल्पांगण सांस्कृतिक केंद्र हे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. संगीतसाथीमध्ये किरण चिटणीस (तबला), मंदार जाधव (पखवाज) आणि ओमकार चव्हाण (कीबोर्ड) यांचा सहभाग आहे. तसेच परिन मोरे आणि अमलेंदु जोशी हे कलाकारही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

बुधवार सकाळ पासून प्रवेशिका फडके नाट्यगृहावर उपलब्ध असतील. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की प्रवेश जरी विनामूल्य असला तरी रसिक प्रेक्षकांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथून प्रवेशिका प्राप्त करून आसन निश्चिती करून घ्यावी.

कलाकारांचे संयोजन महेश चव्हाण (टीमवर्क्स मीडिया सोल्युशन्स) यांनी केले आहे.हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मराठी भाषा, संतपरंपरा आणि संगीतवारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.