Press "Enter" to skip to content

नवसाला पावणारी पाच गावांची श्रद्धास्थान “नांदाई माता” चैत्र शुद्ध सप्तमीला भरते वार्षिक यात्रा; उलवे, कोंबडभुजे, तरघर, मोहा आणि गणेशपुरीच्या ग्रामस्थांची अढळ श्रद्धा


पनवेल, दि.१२ (वार्ताहर) : पनवेलसह उरण भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उलवे, कोंबडभुजे, तरघर, मोहा आणि गणेशपुरी या पाच गावांतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेली नांदाई माता नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या प्राचीन मंदिराची स्थापना नेमकी कधी आणि कोणी केली, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी अनेक पिढ्यांपासून ग्रामस्थांकडून देवीची भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जात आहे.

पूर्वी जुन्या विटा, दगड आणि मातीपासून बांधलेल्या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. सुरुवातीला उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि मोहा या चार गावांतील ग्रामस्थ देवीची सेवा करीत असत. त्यानंतर गणेशपुरी गाव वसल्याने नांदाई मातेचा उल्लेख पाच गावांची देवी म्हणून रूढ झाला. आजही या पाचही गावांतील भाविकांची देवीवर अपार श्रद्धा आहे.

चैत्र शुद्ध सप्तमीला भरते वार्षिक यात्रा
नांदाई मातेची वार्षिक यात्रा चैत्र महिन्यातील शुद्ध सप्तमीला भरते. या यात्रेत परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. नवरात्रोत्सवही मंदिरात भक्तिभावाने साजरा केला जातो. संततीप्राप्ती, आजारपणातून मुक्तता तसेच कौटुंबिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी भाविक देवीला नवस करतात. नांदाई माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

गावांच्या रक्षणाशी संबंधित आख्यायिका
नांदाई मातेच्या महात्म्याशी संबंधित अनेक आख्यायिका परिसरात प्रचलित आहेत. देवी रात्री वृद्ध महिलेचे रूप धारण करून गावांमध्ये फेरफटका मारत असे, अशी कथा ग्रामस्थ सांगतात. तसेच, मीठाने भरलेल्या ट्रकच्या चालकांनी देवीला मालाबाबत खोटी माहिती दिल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभवाची कथाही परिसरात सांगितली जाते. नांदाई माता ही पांडवांची बहीण होती, अशीही स्थानिक श्रद्धा आहे. या आख्यायिकांमुळे देवीविषयीची श्रद्धा पिढ्यान्‌पिढ्या जपली गेली आहे.

उलवे नोडमध्ये उभारले भव्य मंदिर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांतील भाविकांना आपल्या श्रद्धास्थानाचे दर्शन घेता यावे, यासाठी उलवे नोडमध्ये सिडकोच्या आर्थिक सहाय्याने नांदाई मातेचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामुळे पाच गावांतील ग्रामस्थांना आपल्या धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि श्रद्धेशी जोडलेले राहण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र उपलब्ध झाले आहे.

आधुनिक विकासाच्या वाटचालीत गावांचे मूळ स्वरूप बदलले असले, तरी नांदाई मातेवरील ग्रामस्थांची श्रद्धा आजही कायम आहे. त्यामुळे नांदाई माता ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून पाच गावांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक एकतेची ओळखही बनली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.