
रसायनी (आनंद पवार)
मोहोपाडा येथील मुख्य बाजारपेठेत शारदेय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आणि रविवारच्या आठवडे बाजारामुळे नागरिकांची तुफान गर्दी उसळली. खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची मोठी वर्दळ,रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण आणि रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते यामुळे वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले.वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे नागरिकांची गैरसोय झाली,तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
मोहोपाडा ही रसायनी परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे खरेदीसाठी येत असतात. मात्र, बाजारपेठेतील रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण,रस्त्यावरच मांडण्यात येणारी दुकाने आणि भाजीविक्रेत्यांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे. त्यातच परिसरात वाढत असलेली लोकवस्ती आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल बनत चालला आहे.रविवारचा आठवडे बाजार आणि नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असा दुहेरी योग आल्याने मोहोपाडा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.रविवारची सुटी असूनही मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला.एरवी याच मार्गावरून शालेय विद्यार्थी,कामगार वर्ग तसेच प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसेस धावत असतात.त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिक्रमण हटणार कधी ? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
मोहोपाडा बाजारपेठेतील वाहतूक कोंडी ही काही आजची समस्या नाही.वारंवार निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते आणि वाढते अतिक्रमण यांचा वाहतुकीवर थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने केवळ तात्पुरती वाहतूक व्यवस्था करण्यापुरते मर्यादित न राहता, अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
मोहोपाडा बाजार पेठेला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करून नागरिकांना मोकळा रस्ता कधी मिळणार? अतिक्रमण हटविणे, भाजीविक्रेत्यांसाठी नियोजित जागा उपलब्ध करणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी अपेक्षानागरिकां कडून व्यक्त होत आहे.वाहतूक पोलिसांचे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न बाजार पेठेतील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, सहाय्यक फौजदार यशवंत झेमसे, पोलीस कॉन्स्टेबल फौजदार यशवंत झेमसे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल राम तिडके आणि निलेश गडाख हे पोलीस कर्मचारी विशेष प्रयत्न करताना दिसून आले. वाहनांची गर्दी नियंत्रित करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.मात्र,वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाही रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम असल्याने केवळ पोलिसांच्या प्रयत्नांवर हा प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का आणि मोहोपाडा बाजारपेठेला वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास मिळणार का,हा खरा प्रश्न आहे!



Be First to Comment