
रसायनी (आनंद पवार)
रविवार पासून प्रारंभ होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलीस ठाण्यात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी,पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांनी नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, उत्सव भक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन केले. नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे.या उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही,तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही,याची जबाबदारी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी घ्यावी.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,असे डॉ.नेहुल यांनी स्पष्ट केले.

महिला भगिनींच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य द्या
नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा नृत्याचे आयोजन करताना महिला,भगिनी आणि तरुणींच्या सन्मानाची व सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उत्सवाच्या आनंदात कोणाच्याही अधिकारांचे उल्लंघन होणार नाही,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही,यासाठी मंडळांनी सतर्क राहावे,भक्ती, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपत नवरात्रोत्सव साजरा करावा,असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांनी केले.
डीजेचा वापर टाळा; ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळा ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या वापराबाबत न्यायालयीन आदेश व शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेत निर्धारित ध्वनिमर्यादेचे पालन करावे.शक्यतो डीजेचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.रात्री दहानंतर गरबा सुरू ठेवल्यास कारवाईचा इशारा
दांडिया आणि गरबा नृत्याचे कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत संपविण्याबाबत डॉ. नेहुल यांनी मंडळांना सूचना दिल्या. निर्धारित वेळेचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरू ठेवल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयोजकांनी ध्वनिक्षेपक वापरा संबंधी लागू असलेल्या नियमांची तसेच कोणत्याही विशेष परवानगीच्या अटींची खातरजमा करूनच कार्यक्रमाचे नियोजन करावे, असेही आवाहन करण्यात आले.
नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा उत्सव आहे.त्यामुळे सर्व मंडळांनी नियमांचे पालन करून, नागरिकांच्या सहकार्याने आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करत उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांनी केले.



Be First to Comment