
पनवेल (प्रतिनिधी) : नवीन पनवेल परिसरातील अस्तित्वात असलेल्या जुन्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता, गाळ काढणे आणि आवश्यक दुरुस्ती करून त्या पुनर्वापरात आणाव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेविका अॅड. शिवानी सुनील घरत यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पनवेल परिसरातील काही भागांत सध्या पाणीटंचाईची समस्या जाणवत असून, दुसरीकडे परिसरातील अनेक जुन्या विहिरी जीर्ण अवस्थेत असल्याने त्यांचा वापर होत नाही. या विहिरींची योग्य देखभाल व दुरुस्ती केल्यास त्या पुन्हा वापरात आणणे शक्य होणार आहे.
या विहिरींची पाहणी करून त्यांची स्वच्छता करणे, त्यातील गाळ काढणे, आवश्यक दुरुस्ती करणे तसेच विहिरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या माध्यमातून उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग वाढण्यास मदत होईल. तसेच पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पर्यायी जलस्रोत उपलब्ध होऊ शकतील.
त्यामुळे नवीन पनवेल परिसरातील सर्व अस्तित्वात असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांच्या स्वच्छतेसह आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि त्या पुनर्वापरात आणण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने सूचना द्याव्यात, अशी विनंती अॅड. शिवानी सुनील घरत यांनी महापौर नितीन पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


Be First to Comment