
पनवेल (प्रतिनिधी) संघर्षाच्या वाटेवरून कर्तृत्वाची शिखरे सर करताना आपल्या यशाचा प्रत्येक टप्पा समाजाच्या सेवेसाठी समर्पित करणारे, गोरगरिबांच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणारे आणि दानशूरपणातून माणुसकीचा वसा जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नुकताच प्रतिष्ठेच्या ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ गौरविण्यात आले. या सन्मानानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्यकारिणी सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, संजय सोनावणे, सचिव हरेश साठे, खजिनदार दत्तात्रेय कुलकर्णी, प्रवीण मोहोकर आदी पदाधिकारी तसेच भाजपचे युवा नेते संजय जैन, पत्रकार अप्पासाहेब मगर, आपले रायगडचे संपादक सुनील वारगडा उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव नव्हे, तर संघर्षातून उभे राहून समाजाच्या सुख-दुःखाशी आपले नाते घट्ट करणाऱ्या सेवाव्रती विचारांचा सन्मान आहे. सामान्य परिस्थितीतून प्रवास सुरू करून व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मोठेपणाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता सामान्य माणसांमध्ये सहजपणे मिसळणे, गरजूंच्या अडचणी जाणून घेणे आणि मदतीची हाक येण्यापूर्वीच शक्य ते सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावणे, ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या दातृत्वाला केवळ आर्थिक मदतीची मर्यादा नाही, तर त्यामागे माणसांप्रती असलेली आस्था, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि समाजाने दिलेले समाजालाच परत करण्याची उदात्त भावना आहे. त्यामुळेच अनेक गरजू कुटुंबांसाठी ते आधारवड, विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण, तर समाजातील विविध घटकांसाठी विश्वासाचे नाव बनले आहेत.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय आरोग्य, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना दिलेले पाठबळ त्यांच्या सेवाकार्याची व्याप्ती अधोरेखित करते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासात कष्ट, जिद्द, संघर्ष आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरुवात करून त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविले; मात्र यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही सामान्य माणसांशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभाग घेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांशी आपली बांधिलकी जपली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जनहिताला प्राधान्य दिले आणि निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झाल्यानंतरही समाजकार्यातील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला असून त्यांचा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार म्हणजे समाजहितासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. दरम्यान या सत्काराबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे आभार व्यक्त केले तसेच मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे कौतुकही केले.




Be First to Comment