
पनवेल, दि.१० (वार्ताहर) : पनवेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पनवेलची बालकलाकार अहाना केदार सोमण हिची लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या जाहिरातीसाठी निवड झाली असून, तिची जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे. नव्या क्षेत्रातील संधी आत्मविश्वासाने स्वीकारत अहानाने चित्रीकरण पूर्ण केले. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि पनवेलकरांकडून तिचे कौतुक होत आहे.
अहानासाठी जाहिरातीतील कामाचा अनुभव नवीन होता. मात्र, या संधीचा तिने सहजतेने सामना केला. चित्रीकरणादरम्यान दाखवलेला आत्मविश्वास आणि संयम यामुळे तिच्या कुटुंबीयांसाठी हा अनुभव विशेष ठरला. लहान वयातच अभिनयाच्या क्षेत्रात मिळालेली ही संधी तिच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अहानाच्या या प्रवासात तिचे वडील केदार सोमण यांच्यासह प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर, रविकांत काळे, सई सोमण तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे अहानाला ही संधी आत्मविश्वासाने स्वीकारता आली.
झोमॅटोच्या जाहिरातीच्या माध्यमातून अहानाला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. तिच्या या यशामुळे पनवेलच्या कलाक्षेत्रातील युवा प्रतिभेची पुन्हा एकदा चर्चा होत असून, अहानाच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.



Be First to Comment