
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी; डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पनवेल, दि.९ (वार्ताहर) : भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) शिवाजी चौक येथे निषेध सत्याग्रह करण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पुकारलेल्या ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, माजी नगरसेविका शशिकला सिंग, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष राज सदावर्ते, एआयसीसीचे पदाधिकारी राकेश चव्हाण, जोन जेम्स, विशाल गोगावलकर, अजय कापरे, अमीना खान, मोहसूर खान, जिनेद मालदार, असल्फा खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकशाही मूल्यांचे रक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वासाठी काँग्रेसचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Be First to Comment