
पनवेल, दि.७ (वार्ताहर) : अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनलशी संलग्न न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी सन २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशिया चषक २०२६ तसेच अखिल भारतीय खुल्या कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली.
देशभरातील तसेच विविध राज्यांतील उत्कृष्ट कराटेपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धांमध्ये न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने सामने खेळत आपल्या कौशल्याची छाप पाडली. कुमिते आणि काटा या विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत खेळाडूंनी अनेक पदके पटकावली. त्यांच्या या यशामुळे क्लब, पालक आणि नवी मुंबईचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
खेळाडूंच्या या यशामागे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्त, कठोर सराव तसेच पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा आहे. स्पर्धात्मक स्तरावर खेळाडूंना तयार करण्यासाठी क्लबच्या वतीने नियमित प्रशिक्षणासोबतच स्पर्धेपूर्व तयारी, विशेष सराव आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.
न्यू बॉम्बे कराटे क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष रोहन यादव, अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनल इंडियाचे राष्ट्रीय प्रतिनिधी योगेश कांबळी आणि क्लबचे संचालक बिपिन राय यांनी सर्व विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, पदक जिंकणे हा यशाचा एक भाग आहे; मात्र प्रत्येक स्पर्धेतून अनुभव घेऊन पुढील स्तरावर अधिक चांगली कामगिरी करणे हे क्लबचे मुख्य उद्दिष्ट आहे. न्यू बॉम्बे कराटे क्लबमधील प्रत्येक खेळाडूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणखी मोठे यश मिळविण्याचा निर्धार न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.




Be First to Comment