
FLY९१ चे पहिले विमान दाखल; सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा व अगत्तीशी थेट हवाई जोडणी
पनवेल /नवी मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, गोवा मुख्यालय असलेल्या प्रादेशिक विमान कंपनी FLY९१ च्या विमानाचे सोमवारी (५ ऑक्टोबर) नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झाले. हैदराबादहून आलेल्या या औपचारिक विमानाचे पारंपरिक जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले. या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या हवाई नेटवर्कमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विमान कंपनीची भर पडली आहे.
FLY९१ च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा (GOX) आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट हवाई सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील पर्यटन, व्यवसाय आणि प्रादेशिक प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नवी मुंबई हे FLY९१ चे १४वे देशांतर्गत गंतव्यस्थान आणि महाराष्ट्रातील पाचवे ठिकाण ठरले आहे. कंपनीच्या नेटवर्कमध्ये गोवा, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अगत्ती, कोची, हुबळी, राजमुंद्री, विजयवाडा आणि तिरुपती यांसारख्या शहरांचा समावेश आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी सुभाष मुरिकेनचेरी म्हणाले, “FLY91 चे नवी मुंबई विमानतळावरील आगमन हे विमानतळाच्या वाढत्या हवाई नेटवर्कमध्ये महत्त्वाची भर आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगत्ती या चारही गंतव्यांना पर्यटन, व्यवसाय आणि प्रादेशिक प्रवासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नवी मुंबईला मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी अधिक सोयीचे प्रवेशद्वार बनविण्याच्या दिशेने आमचा नेटवर्क विस्तार सुरू आहे.”
४० ATR विमानांची ऑर्डर
FLY९१ आपल्या विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरही वेगाने काम करत आहे. कंपनीने अलीकडेच सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर किमतीच्या ४० ATR ७२-६०० विमानांची निश्चित ऑर्डर दिली आहे. या विमानांची डिलिव्हरी २०२७ ते २०३२ या कालावधीत होणार असून, त्याद्वारे कंपनीला आपला ताफा सध्याच्या सहा विमानांवरून ६० विमानांपर्यंत वाढविता येणार आहे.

FLY९१ चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर FLY९१ चे विमान प्रथमच दाखल होत असल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आजचे औपचारिक उड्डाण महिला कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पथकाने संचालित केले. FLY९१ च्या सुरुवातीपासून आमच्या प्रवासात सहभागी असलेले गुंतवणूकदार, हितचिंतक आणि मित्र या विमानात सहभागी होते.”ते पुढे म्हणाले, “सुमारे अडीच वर्षांपूर्वी आम्ही दोन विमानांद्वारे तीन गंतव्यस्थानांना जोडत सेवा सुरू केली. आता या हिवाळी वेळापत्रकात १४ गंतव्यस्थानांवर आठवड्याला ३५० हून अधिक उड्डाणे चालविण्याचे आमचे नियोजन आहे. नवी मुंबई हे आमच्या नेटवर्कमधील महत्त्वाचे गंतव्यस्थान असून, येथून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगत्तीला जोडणी देण्यात येणार आहे. पश्चिम भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांना जोडणारे व्यवहार्य प्रादेशिक हवाई नेटवर्क उभारणे हा आमचा उद्देश आहे.”
नवी मुंबई विमानतळावर ३२ लाखांहून अधिक प्रवासी
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक सेवा सुरू केल्यापासून ३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून, देशातील नव्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीमध्येही वेगाने विस्तार होत आहे.
विमानतळाची सुरुवात १३ गंतव्यस्थानांपासून झाली होती. आता नवी मुंबई विमानतळावरून सुमारे ४३ देशांतर्गत गंतव्यस्थानांना जोडणी उपलब्ध झाली असून, आतापर्यंत २५,२९५ हून अधिक व्यावसायिक विमानांचे संचालन झाले आहे. वाढते हवाई नेटवर्क आणि वाढता प्रवासी प्रतिसाद यामुळे नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून उदयास येत आहे.




Be First to Comment