Press "Enter" to skip to content

नवरात्र-दिवाळीतही गणेशोत्सवाप्रमाणे वाहतूक नियोजन कराभाजप सरचिटणीस अमित ओझे यांची वाहतूक पोलिसांकडे मागणी; पार्किंग, अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन


पनवेल, दि.६ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात पनवेल शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनाची पुनरावृत्ती आगामी नवरात्रोत्सव आणि दिवाळीतही करावी, अशी मागणी भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे यांनी केली आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत झाली. वाहतूक शाखेने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून केलेली पूर्वतयारी, तात्पुरते मार्गबदल, उरण फाटा व अटल सेतूचा योग्य वापर तसेच बेकायदा पार्किंगविरोधातील कारवाई यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहिली, असा दावा ओझे यांनी केला.
या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळातही पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठा, एसटी बसस्थानक परिसर तसेच खरेदीच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच ‘ट्रॅफिक आणि पार्किंग प्लॅन’ आधीच तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंगवर वेळेत कारवाई करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय कायम ठेवावा, असेही ओझे यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळातील नियोजनामुळे भाविक, व्यापारी आणि वाहनचालकांना दिलासा मिळाल्याचे सांगत, आगामी सणांमध्येही अशाच पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन केल्यास गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.