Press "Enter" to skip to content

‘मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या संस्कारांची केंद्रे’ – समाजसेवक प्रभाकर जोशी

पनवेल (प्रतिनिधी) मराठी शाळा या केवळ ज्ञान देणाऱ्या संस्था नसून विद्यार्थ्यांच्या संस्कारांची केंद्रे आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला मिळणारी प्रत्येक छोटीशी मदत ही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन भाजपचे कार्यकर्ते व समाजसेवक प्रभाकर जोशी यांनी केले.

 सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने रायगड जिल्हा उच्च प्राथमिक केंद्रशाळा, तलोजे पाचनंद येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रभाकर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य ही केवळ वस्तू नसून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला दिलेली छोटीशी साथ आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा योग्य उपयोग करून मनापासून अभ्यास करावा आणि आपल्या शाळेचे, पालकांचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे,” असेही जोशी यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला मधुकर गरुडे, हसनेण पटेल, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किशोर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम गायकवाड, रियाज पटेल, मुख्याध्यापक शंकर ठाकूर, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने मराठी शाळांच्या गरजा जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाद्वारे शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शैक्षणिक साहित्य, अभ्यासिका तसेच विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप, अभ्यासिका व डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच शाळांची रंगरंगोटी व सुशोभीकरण अशा विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.