

रसायनी — राकेश खराडे
स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा यांच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत रसायनी-पाताळगंगा परिसरात स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानाचा एक भाग म्हणून शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहोपाडा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी,वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे रस्ते तसेच परिसराची स्वच्छता केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून तो पिशव्यांमध्ये भरून घंटागाडीत जमा करण्यात आला. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पाताळगंगाचे प्रेसिडेंट सुंदर राजन रंगराजन व पंकज यादव, तसेच थॉमस इसो, अचिंत्य चक्रवर्ती,रिशेल गडाख, संतोष विचारे, केतन नाईक, रामदास मदने, रामदास भांड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उमाताई मुंढे, माजी सरपंच संदीप मुंढे, ग्रामविकास अधिकारी वैशाली जाधव, सदस्या स्वप्नाली मैदर्गीकर, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, दि. १ ऑक्टोबर रोजी कैरे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, शाळा व परिसराची स्वच्छता, तसेच गाव स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच खाऊ देण्यात आला.
या अभियानादरम्यान उपस्थितांनी स्वतःची, घराच्या आजूबाजूची, गावाची तसेच कंपनी परिसराची स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या उपक्रमामुळे रसायनी-पाताळगंगा परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीला चालना मिळाली.


Be First to Comment