Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यातील ‘राजवाड्याच्या राजा’महागणपतीला भावपूर्ण निरोप !

ढोल-ताशांचा गजर,फुलांची उधळण अन् बाप्पाच्या जयघोषाने मोहोपाडा-रसायनी दुमदुमले;१९ वर्षांची राजवाडा ग्रुपची परंपरा कायम

रसायनी (आनंद पवार)-मोहोपाडा येथील‘राजवाड्याचा राजा’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागणपतीला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोहोपाडा-रसायनीकरांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात भावपूर्ण निरोप दिला. ढोल-ताशांचा कडकडाट,फुलांची उधळण,फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण मोहोपाडा परिसर दुमदुमून गेला.

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील शिवसेना शाखा कार्यालयाजवळ दरवर्षी राजवाडा ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवाचे भव्य आयोजन केले जाते.यंदा या उत्सवाला १९ वर्षांची परंपरा लाभली असून,या प्रदीर्घ परंपरेत राजवाडा ग्रुपने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.‘लालबागचा राजा’च्या प्रतिकृतीची आठवण करून देणारी भव्य-दिव्य गणरायाची मूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते.रसायनी पंचक्रोशीतील विविध राजकीय,सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह आबालवृद्ध गणेशभक्त मोठ्या संख्येने या गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मोहोपाडा बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण होते.

जयघोषाने परिसर दणाणला अनंत चतुर्दशीच्या दिवशी‘राजवाड्याच्या राजा’ला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त मोहोपाडा बाजारपेठेत दाखल झाले.ढोल-ताशांच्या गजरात,फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशःदणाणून निघाला.राजवाडा ग्रुपचे योगदान राजवाडा ग्रुपच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून गणेशोत्सवाची ही परंपरा जपली जात आहे.

उत्सवाच्या दहा दिवसांत विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.मंडळाला भेट देणाऱ्या राजकीय,सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा राजवाडा ग्रुपच्या वतीने सन्मानही करण्यात येतो.या संपूर्ण गणेशोत्सवाच्या आयोजनामध्ये समीर म्हात्रे,भूषण पाटील,सचिन पाटील, कुणाल पाटील,सचिन महाडिक,चैतू खारकर,अरुण महाडिक,विनोद पाटील, मंगेश पाटील,राकेश खारकर,प्रदीप पाटील,
विश्वनाथ भोईर,निलेश महाडिक,अजय म्हात्रे, अक्षय पाटील यांच्यासह राजवाडा ग्रुपच्या सर्व सहयोगी सदस्यांचे मोलाचे योगदान राहते.१९ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा पुढेही अशीच सुरू राहावी,अशी भावना यावेळी गणेशभक्तांनी व्यक्त केली.भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांच्या डोळ्यांत पाणी तरळले आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत गणरायाला निरोप देण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.