
पनवेल : प्रतिनिधी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या मराठा भवन कार्यालयात समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाजासमोरील विविध प्रश्नांसह सिडकोकडून प्राप्त झालेल्या तोडक कारवाईच्या नोटिसांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिडकोच्या नोटिसांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये समाजबांधवांनी घाबरून न जाता कायदेशीर व प्रशासकीय मार्गाने एकजुटीने लढा देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. या विषयावर पुढील कायदेशीर प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, प्रशासकीय पातळीवर करावयाचा पाठपुरावा तसेच समाजाच्या हितासाठी घ्यावयाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुंबईतील मागील मराठा आंदोलनाच्या काळात कायदेशीर प्रक्रिया सांभाळणारे ॲड. आशिष राजे गायकवाड यांनी उपस्थित समाजबांधवांना समाजहिताच्या दृष्टीने मोलाचे कायदेशीर मार्गदर्शन केले. सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर बाबी समजावून सांगताना उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या “मुंबई थ्री झिरो – मुंबई वारीच्या” च्या पार्श्वभूमीवर खांदा कॉलनीतील समाजबांधवांचा सहभाग, नियोजन, व्यवस्था आणि आवश्यक तयारी याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
समाजाच्या प्रश्नांवर शांततामय, कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सिडकोच्या कारवाईच्या नोटिसांबाबत समाजबांधवांच्या हितासाठी योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून पुढील नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीस सकल मराठा समाज मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. समाजाच्या हक्कांसाठी एकजूट, कायदेशीर लढा आणि संघटित प्रयत्न यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.



Be First to Comment