Press "Enter" to skip to content

खानदेशात बैलपोळ्याचा उत्साह;सर्जा-राजाच्या पूजनाने गावागावांत चैतन्य ; ईळा पिळा टळो… बळीराजाचे राज्य येवो’च्या जयघोषात पारंपरिक सणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरसोदे,बहादरपूर, महाळपूर,आंबापिंप्री परिसरात थाटामाटात आयोजन

जळगाव (आनंद पवार)

खानदेशातील शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा,पवित्र आणि पारंपरिक असा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात,आनंदमय व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.वर्षभर शेतकऱ्याच्या शेतीकामात खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने ग्रामीण भागात बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे.

ईळा पिळा टळो.. बळीराजाचे राज्य येवो अशी प्रार्थना करीत शेतकरी कुटुंबांनी आपल्या बैलांची मनोभावे पूजा केली. शेतकऱ्याच्या कष्टाच्या संसारात बैल हा केवळ शेतीकामाचा साथीदार नसून कुटुंबातील सदस्याप्रमाणेच मानला जातो.त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्याला विश्रांती देऊन त्याचा सन्मान करण्याची खानदेशातील परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.बैलांच्या सजावटीने गावागावांत रंगत
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरसोदे, बहादरपूर, महाळपूर, आंबापिंप्री यासह विविध गावांमध्ये बैलपोळ्याची मोठी लगबग पाहायला मिळाली. पोळ्याच्या काही दिवस आधीपासूनच शेतकरी कुटुंबांमध्ये बैलांच्या सजावटीची तयारी सुरू होती. बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना विविध रंगांनी सजविण्यात आले.त्यांच्या अंगावर आकर्षक झूल,गोंडे, घुंगरू,रंगीबेरंगी दोर तसेच विविध पारंपरिक अलंकार चढविण्यात आले.

सजविलेल्या बैलांची जोडी पाहण्यासाठी गावातील नागरिक,लहान मुले आणि महिलांनी मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी सजविलेल्या बैलांच्या जोड्या घरासमोर उभ्या करून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यामुळे गावातील वातावरणात पारंपरिक संस्कृतीची आणि उत्सवाची रंगत निर्माण झाली.

माता-भगिनींकडून विधिवत पूजा बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी कुटुंबातील माता-भगिनींनी बैलांची मनोभावे पूजा करून औक्षण केले.बैलांच्या कपाळावर कुंकू-हळदीचा टिळा लावण्यात आला.त्यांना नैवेद्य दाखवून गोडधोड खाऊ घालण्यात आले.बैलांच्या आरोग्यासह शेतकऱ्याच्या घरात सुख,समृद्धी आणि भरभराट नांदावी,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचे असलेले महत्त्व या दिवशी प्रकर्षाने जाणवून आले.उन्हाळा,पावसाळा असो अथवा हिवाळा शेतीच्या कामात शेतकऱ्यासोबत सतत मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही अनोखी परंपरा आहे.

ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणारा सण
आधुनिक काळात शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढले असले, तरी बैलपोळ्याचे महत्त्व आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले नाते आजही कायम आहे. शेतीच्या बदलत्या स्वरूपात बैलांचा प्रत्यक्ष वापर काही प्रमाणात कमी झाला असला तरी बळीराजा आणि सर्जा-राजामधील भावनिक नाते या सणामुळे आजही जिवंत असल्याचे चित्र खानदेशातील गावागावांत पाहायला मिळते.बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण नसून शेतकरी,शेती आणि पशुधन यांच्यातील अतूट नाते जपणारी खानदेशाची समृद्ध परंपरा आहे.या दिवशी शेतकरी आपल्या कष्टाच्या साथीदाराचे ऋण मान्य करतो आणि त्याच्याप्रती आदर व्यक्त करतो.उत्साहात पार पडला पारंपरिक सोहळा
शिरसोदे,बहादरपूर, महाळपूर,आंबापिंप्री परिसरासह पारोळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैलपोळ्यामुळे दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. घराघरांत पूजा,औक्षण आणि नैवेद्याचे कार्यक्रम पार पडले. सजविलेल्या बैलांच्या जोड्यांमुळे गावातील रस्ते आणि वाड्या-वस्त्यांना जणू पारंपरिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बळीराजा सुखी राहो,शेतीला भरघोस पीक येवो,संकटे दूर जावोत आणि शेतकरी कुटुंबांच्या घरात सुख-समृद्धी नांदो,अशी भावना व्यक्त करीत खानदेशातील शेतकरी बांधवांनी बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. ग्रामीण संस्कृतीची मुळे अधिक घट्ट करणारा आणि शेतकरी-बैलांच्या नात्याची जाणीव करून देणारा हा सण खानदेशात मोठ्या थाटामाटात पार पडला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.