
ब्रिटन : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना आज ब्रिटनच्या ऐतिहासिक हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडून, लोकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत नागरिक-केंद्रित, संवेदनशील आणि गतिमान प्रशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याची ही जागतिक पातळीवर झालेली दखल आहे.
‘माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ यांसारख्या लोकाभिमुख उपक्रमांपासून ते महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या विविध निर्णयांपर्यंत त्यांच्या कार्याची व्यापकता या सन्मानातून अधिक ठळक झाली आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, जगातील मान्यवरांच्या उपस्थितीत असलेल्या या ऐतिहासिक सभागृहात ‘नमस्कार… जय महाराष्ट्र’ या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून साहेबांनी मराठीचा अभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली.
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये घुमलेला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद हा केवळ एका पुरस्कार सोहळ्याचा क्षण नव्हता; तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि मराठी मातीच्या सामर्थ्याचा गौरव होता. उपमुख्यमंत्री साहेबांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा गौरव तर आहेच, पण महाराष्ट्रातील कष्टकरी जनता, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचाही सन्मान आहे.



Be First to Comment