Press "Enter" to skip to content

पेणमध्ये ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या अल्बम साँगचे चित्रीकरण ; गौरी- गणपती सणानिमित्त रसिकांच्या भेटीला

पेण, दि. 10 (वार्ताहर) : येत्या गौरी- गणपती सणानिमित्त श्री. लाभेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या नवीन मराठी अल्बम साँगचे चित्रीकरण नुकतेच पेण येथे मोठ्या उत्साही वातावरणात पूर्ण करण्यात आले. पेणमधील म्हाडा कॉलनी येथील ‘शिव-शंभो’ बंगल्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले असून हा अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या गीताला गायिका वर्षा लाभेश पाटील यांचा सुमधुर आवाज लाभला आहे.तर गीतलेखन निखिल भोईर (धोंडपाडा, पेण) यांनी केले असून, सुनील म्हात्रे (पेण) यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका चित्रा चोगले यांनी कोरससाठी साथ दिली आहे.अल्बममधील नृत्यरचना प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयुरेश पाटील (रामराज, अलिबाग) यांनी केली असून चित्रीकरणाची जबाबदारी आकाश मोकल (कळवे, पेण) आणि निलेश पाटील (पेण) यांनी सांभाळली आहे.आकर्षक नृत्यरचना, सुरेख छायांकन आणि पारंपरिक वातावरणामुळे हे गीत प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

या अल्बम साँगमध्ये अदिती (ॲश) पाटील हिने मुख्य भूमिका साकारली आहे.तर तिच्यासोबत कु.ओवी कैलास घरत, तन्वी पाटील, मनस्वी जाधव, प्रगती जाधव, सुजाता पवार, प्रियांका पवार, सायली म्हात्रे, रोशनी पाटील, मृण्मयी पाटील, रिया पाटील, अन्वी माळी आणि आरोही पाटील या सहकलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.अल्बमच्या चित्रीकरणाच्या वेळी श्री. व सौ. मेघा उपेंद्र पाटील (उलवे) आणि सौ. मयुरी कैलास घरत (खारपाडा) यांचीही उपस्थिती लाभली.

हा अल्बम साकारण्यासाठी श्री. सुनील पाटील (साज मराठी), पत्रकार कैलास घरत, मूर्तिकार निलेश दीपक समेळ, प्रशांत पोतदार, प्रांजली पोतदार (पेण), अमित माळी (उरण) आणि ‘शिव-शंभो’ बंगल्याचे मालक तथा समाजसेवक गणेश गायकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती यावेळी निर्मात्यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.