Press "Enter" to skip to content

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्चगणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून एरिया डॉमिनेशन


पनवेल, दि.८ (वार्ताहर) : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या (RAF) जवानांनी शहरातील विविध संवेदनशील भागांतून रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन केले.

पनवेल शहर पोलीस ठाण्यापासून सुरुवात झालेल्या या मार्चमध्ये ५२ बंगला, साईनगर, ख्वाजा नगरी मशीद, साई श्रद्धा मित्र मंडळ, बंदर रोड, ओंकारेश्वर महादेव मंदिर, आयशा मशीद, आदिल टॉवर, सुफा मशीद, एम.जी. रोड, कच्ची मोहल्ला, मुसलमान नाका, पाडा मोहल्ला मशीद, जलालशहा दर्गा, पनवेल महानगरपालिका कार्यालय, जय भारत नाका, लाईन आळी, वीरुपक्ष मंदिर, आदर्श हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
या रूट मार्चमध्ये पनवेल शहर पोलिस ठाण्याचे ७ अधिकारी आणि ३५ पोलीस अंमलदार, तसेच आरएएफ बी-१०२ चे एक उपकमांडर, एक सहाय्यक कमांडर, पाच निरीक्षक, आठ उपनिरीक्षक आणि १०१ अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांची दोन आणि आरएएफची तीन वाहनेही या मोहिमेत सहभागी होती.

आगामी सणांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला. सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, यासाठी पोलिसांकडून शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वपोनि बाळा कुंभार यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.