


रसायनी (आनंद पवार):प्राईमा रसायनी आणि समर्थ नेत्रालय डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६ सप्टेंबर रोजी सीबी रोड कॉर्नर जवळील एचडीएफसी बँकेच्या शेजारी असलेल्या समर्थ नेत्रालय डोळ्यांचे हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला रसायनी व पाताळगंगा परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात तब्बल २५० हून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान ३६ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.प्राईमा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना डोळ्यांचे ड्रॉप्स मोफत देण्यात आले,तर तब्बल १८० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमातून गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

डिजिटल युगात डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. निशिगंधा म्हशेळकर यांनी केली.त्यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत उपस्थित डॉक्टर,मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले.समर्थ नेत्रालयातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.विशालाक्षी शेंडबाळे यांनी ‘डिजिटल आय स्ट्रेन’तसेच डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी,याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.मोबाईल,संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांचा वाढता वापर लक्षात घेता डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.डॉ.प्रतिभा महिद्रकर यांनी प्राईमा कमिटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराचा उद्देश आणि सामाजिक बांधिलकी याबाबत माहिती दिली.आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू नागरिकांना वेळेवर नेत्र तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.शेवटी त्यांनी उपस्थित डॉक्टर,प्राईमा कमिटीचे पदाधिकारी,नागरिक व शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
मोतीबिंदूसह विविध नेत्रविकारांचे वेळेत निदान व्हावे आणि नागरिकांना निरोगी दृष्टीचा लाभ मिळावा,या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.


Be First to Comment